Pimpri : ‘हर घर दस्तक अभियाना’त नावांचा गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri chinchwad

‘हर घर दस्तक अभियाना’त नावांचा गोंधळ

पिंपरी : कोविड लसीकरणांतर्गत शहरात ‘हर घर दस्तक अभियान’ राबविण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयनिहाय प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती केल्या आहेत. मात्र याद्या अद्ययावत न केल्यामुळे त्यामध्ये स्वेच्छानिवृत्त आणि सेवानिवृत्त शिक्षकांची नावे असून कर्मचाऱ्यांच्या नावाचा गोंधळ उडाला आहे. यावरून शिक्षण विभाग आणि वैद्यकीय विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा नमुना पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

लसीकरण अभियानासाठी वैद्यकीय विभागाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षकांना लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे काम दिले आहे. या अभियानात शहरातील ७ रूग्णालयांतर्गत कामकाज चालणार आहे. या केंद्रांमार्फत ३६० प्राथमिक शिक्षण विभागाचे पदवीधर, उपशिक्षक व बालवाडी शिक्षिकांची नियुक्ती केली आहे. यादी तयार केली, पण प्राथमिक शिक्षण विभागाने पाठविलेल्या यादीत शिक्षकांची नावे कमी आणि सेवानिवृत्त शिक्षकांची नावे अधिक आहेत.

असा आहे गोंधळ

चेतना राजपूत या उपशिक्षिकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. तरीही त्यांच्या नावापुढे विद्यानिकेतन, पिंपरी वाघेरे ही शाळा दाखवली आहे. तर मार्च २०२०मध्ये विजया पाटील यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे. तरी त्यांच्या नावाचा समावेश आहे. काहीजण सेवानिवृत्त होऊन २ वर्षे उलटली आहेत. अनेक शिक्षकांच्या नावापुढे जुन्याच शाळांची नावे दिली आहे. अनेक शाळांची चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे एकूणच गोंधळ उडालेला दिसून येत आहे.

पहिले पाढे पंचावन्न

यापूर्वीदेखील जानेवारी महिन्यात पल्स पोलिओ मोहीम राबवली होती. त्यासाठी वैद्यकीय विभागाने अशीच यादी तयार केली होती. त्यासाठी ९३९ प्राथमिक शिक्षक व उपशिक्षकाची नियुक्ती केली होती. त्यातही सेवानिवृत्त आणि मृत शिक्षकांची नावे होती. हयात ऐवजी मृतांना कामे दिल्याने प्रशासनाने कळस गाठल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तरीही चुकांतून सुधारण्याऐवजी दोन्ही विभागाने ‘पहिले पाढे पंचावन्न’ गिरविल्याचे दिसून येत आहे.

loading image
go to top