esakal | Video : बांधकामं सुरू झालंय सांगता, पण काम कुठंय; काय म्हणाले मजूर...

बोलून बातमी शोधा

Video : बांधकामं सुरू झालंय सांगता, पण काम कुठंय; काय म्हणाले मजूर...

लॉकडाउनची नियमावली शिथिल होत असताना शहरातील बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे.

Video : बांधकामं सुरू झालंय सांगता, पण काम कुठंय; काय म्हणाले मजूर...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी Coronavirus : कोरोनामुळे दोन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या लॉकडाउनमुळे लई परेशानी झालीय... बांधकाम सुरू झाल्याचं सांगितलं जातंय....पण काम कुठं सुरू झालीयेत.... हाताला काम मिळेलं... घर चालेलं...या आशेनं दोन दिवसांपासून मजूर अड्यावर येतोय, पण काम कुठं मिळतंय... परप्रांतीय कामगार त्यांच्या गावाला निघून गेलेत... पण आमचे हात आजही कामाविना मोकळेचे आहेत... हे असंच सुरू राहिल तर सांगा आम्ही जगायच कसं... अशी कैफियत मांडत मजूर अड्ड्यावरील कामगारांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. 'सकाळ'ने केलेल्या पाहणीमध्ये ही परिस्थिती पाहायला मिळाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनची नियमावली शिथिल होत असताना शहरातील बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला काम मिळेल आणि पुन्हा रोजीरोटी सुरू होईल. या आशेने दोन दिवसांपासून रहाटणी फाटा, काळेवाडी आणि भोसरीमधील मजूर अड्ड्यावर बिगारी, गवंडी कामापासून खोदाईची कामे करणारे शेकडो कर्मचारी येऊ लागले आहेत. 

मजूर अड्ड्यावर एखादी गाडी आली, की काय साहेब बिगारी हवेत का, गवंडी काम करायचं आहे का, कुठे आहे, असे प्रश्‍न विचारत काम मिळवण्यासाठी धडपडत करत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. दोन दिवसांपासून सकाळी नऊ वाजता यायचे, बारा वाजेपर्यंत थांबायचे काम मिळाले, तर जायचे नाहीतर घराकडची वाट धरायची, अशी त्यांची दिनचर्या सुरू आहे. पूर्वी उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल या राज्यातले कामगार या मजूर अड्ड्यावर बघायला मिळायचे. आता ते गावी निघून गेले आहेत. त्यामुळे इथे स्थानिकच राहिले असले, तरी त्यांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावी जाण्यापेक्षा इथचं बरयं...

दोन महिन्यांपूर्वी गावाला जायचं ठरवलं होत. मात्र, अचानक लॉकडाउन लागला आणि सगळ बारगळलं. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त असल्यामुळे आता गावी गेल्यावर गावातले लोक घेतील, की नाही ही चिंता आहेच. जरी घेतलं तरी 14 दिवस वेगळ राहावे लागेल, अशा विचित्र चक्रात अडकण्यापेक्षा इथंच थांबून काम शोधायचं. आता काम मिळत नसलं, तरी उद्या ते नक्‍की मिळंल या आशेवर काटकसरीत दिवस काढायचे, असे बिगारी काम करणाऱ्या विनयने सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पैसे जपूनच वापरावे लागणार...

पूर्वी एका कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करत होतो. काही कारणामुळे अचानक कंपनी बंद पडली. आता करायचे काय असा प्रश्‍न समोर उभा असतानाच खोदाईचे काम करण्यास सुरुवात केली. काम मिळाले तर दिवसाला 400 ते 500 रुपयांचा रोज हातात पडतो. दोन महिन्यांपासून लॉकडाउन असल्यामुळे घरीच बसून आहे. आता दोन दिवसांपासून काम मिळेल म्हणून भोसरीतल्या मजूर अड्ड्यावर येतोय. पण काम कुठं मिळतंय, हातात काम नसल्याने बेचैन झालोय. काम मिळाल नाही, तर पुढं खायचं काय, हा प्रश्‍न आ वासून उभा आहे. परप्रांतीय कामगार गेले असले, तरी स्थानिकांच्या हाताला कुठं काम मिळतंय का, काम मिळाल्यानंतर हातात मिळणारे पैसे आता जपून वापरावे लागणार असल्याचे खोदाई काम करणाऱ्या सत्तावीस वर्षीय अशोक या युवकाने सांगितले.