ग्रेडसेपरेटरमध्ये अडकला पुन्हा कंटेनर;दोन दिवसांतील तिसरी घटना

container-stuck-in-the-grade separator
container-stuck-in-the-grade separator

पिंपरी - पिंपरी ते निगडी या मार्गावरील ग्रेडसेपरेटरमध्ये दोन दिवसांत तीनवेळा कंटेनर अडकल्याच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी हाईट रिस्ट्रेक्‍टर खांब नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसून, जास्त उंचीची वाहनेही थेट आत शिरतात. यामुळे ग्रेडसेपरेटरमध्ये वाहने अडकण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. या घटनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होण्यासह अडकलेल्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

सुरळीत वाहतुकीसाठी मुंबई-पुणे महामार्गावर निगडी ते दापोडी असा साडे बारा किलोमीटरचा ग्रेडसेपरेटर बनविण्यात आला. यामध्ये काही ठिकाणी पूलही आहेत. या मार्गावरून केवळ साडेचार मीटर उंचीच्या वाहनांनाच परवानगी आहे. दरम्यान, मार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या उंचीबाबतचा सूचना फलक तसेच हाईट रिस्ट्रिक्‍टर (उंची रोधक) खांब उभारणे आवश्‍यक आहे. मात्र, ग्रेडसेपरेटरमध्ये काही ठिकाणीच सूचना फलक असल्याचे दिसून येत असून, हाईट रिस्ट्रिक्‍टर तर कुठेच नाहीत. त्यामुळे साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीची वाहने देखील थेट ग्रेडसेपरेटरमध्ये शिरतात. पुलाखालून जात असताना अधिकच्या उंचीमुळे मध्येच अडकतात. अशा घटना घडल्यास ग्रेडसेपरेटरमधील वाहतुकीचा खोळंबा होतो. पूर्णपणे वाहतूक बंद करून सेवा रस्त्याने वळवावी लागते. यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे दिसून येते. 

वाहनांचे नुकसान 
ग्रेडसेपरेटरमध्ये अडकलेले वाहन सहजासहजी न निघाल्यास क्रेनने मागे खेचून वाहन बाहेर काढावे लागते. उंची कमी करण्यासाठी वाहनांची हवा देखील सोडावी लागते. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. क्रेनचा खर्चही अदा करावा लागतो. 

चूक प्रशासनाची, भुर्दंड वाहनचालकांना 
मेट्रोसह रस्त्याच्या सुरू असलेल्या कामांमुळे ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केलेले असते. यामुळे अनेकदा मर्ज ईन-मर्ज आऊटचा अंदाज येत नाही. अशातच हाईट रिस्ट्रिक्‍टरही उपलब्ध नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो. ग्रेडसेपरेटरमध्ये वाहन अडकल्यास वाहनांचे नुकसान तर होतेच. यासह पोलिसांच्या कारवाईलाही सामोरे जावे लागते. 

- उंचीची मर्यादा समजण्यासाठी हाईट रिस्ट्रिक्‍टरची नाही 
- साडे मीटर उंचीच्याच वाहनांना परवानगी 
- ठराविक ठिकाणीच सूचना फलक 
- मर्ज ईन-मर्ज आऊटमध्ये वारंवार होताहेत बदल 

दोन दिवसांतील घटना 
- रविवार दुपारी 1 

निगडीहून दापोडीकडे जाणाऱ्या मार्गावरील पिंपरीतील अहिल्यादेवी होळकर ग्रेडसेपरेटरच्या ठिकाणी मोठा कंटेनर अडकला. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी महाराष्ट्र बॅंकेसमोरील मर्ज आऊटच्या ठिकाणी बॅरिकेट लावून वाहतूक सेवा रस्त्याने वळविली. दोन तासांनी हा कंटेनर बाहेर काढला. 
-सोमवार पहाटे 4 
पहाटे चारच्या सुमारास याच ठिकाणी पुन्हा एक कंटेनर अडकला. कंटेनरच्या चाकातील हवा सोडून तसेच क्रेनच्या साह्याने सकाळी आठ वाजता कंटेनर बाहेर काढण्यात यश आले. यावेळीही वाहतुकीचा खोळंबा झाला. 
- सोमवार दुपारी 2 
दुपारी दोनच्या सुमारास दापोडीकडून निगडीकडे जाणाऱ्या मार्गावरील पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील ग्रेडसेपरेटरच्या ठिकाणी पुन्हा मोठा कंटेनर अडकला. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी मर्ज इनच्या ठिकाणी बॅरिकेट लावून वाहतूक सेवा रस्त्याने वळविली. दीड तासांनी हा कंटेनर बाहेर काढला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com