
कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे
पिंपरी : कचरा व्यवस्थापनामधील कामगारांच्या व्यथा मांडताना सर्व कामे ठेकेदारांमार्फत होत असून, या ठेकेदारीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नाही, या तक्रारीसह कचरा व्यवस्थापनातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (आयएलओ) या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या बैठकीत नुकतीच पुणे येथे चर्चा झाली.
या बैठकीस आयएलओचे उत्तम काम तंत्रज्ञ विभागाचे विकासतज्ज्ञ केल्विन ए. सर्जेंट, राष्ट्रीय प्रकल्प समन्वयक पल्लवी मानसिंघ, ‘एनएफआयटीयू’चे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष यशवंत भोसले आदी उपस्थित होते.या बैठकीत ‘शहरातील कचरा व्यवस्थापनामध्ये उत्तम व सुरक्षित नोकरी’ या विषयावर चर्चा झाली. विशेषत: बायोमेडीकल, प्लॅस्टिक आणि रासायनिक कचऱ्यावर चर्चा झाली.
बैठकीत कामगार संघटना व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. बहुतेक उपस्थितांनी कचरा व्यवस्थापनामधील कामगारांच्या व्यथा मांडल्या. सर्व कामे ठेकेदारांमार्फत होत असून, या ठेकेदारीतील कंत्राटी कामगारांना सुरक्षेची साधने न दिल्याने ते आजारी पडतात. शहरांना स्वच्छ ठेवणारा हा कामगार, मात्र वंचित राहिलेला आहे, अशा कामगारांच्या अनेक प्रश्नांवर या वेळी चर्चा झाली. पुढील बैठक लवकरच घेऊन आजच्या बैठकीतील सूचनांचा आढावा सादर करण्यात येईल, असे सांगून उपस्थितांचे पल्लवी मानसिंग यांनी आभार मानले.
अधिकाऱ्यांना निमंत्रण आवश्यक
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ही आंतरराष्ट्रीय संघटनेची बैठक होत असून, या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनादेखील निमंत्रण देणे आवश्यक होते. ज्या अधिकाऱ्यांच्या शहरात ही बैठक होत आहे, त्यांना निमंत्रण देणे आवश्यक असून शहरातील स्वच्छतेबाबतचे प्रश्न व कामगारांच्या व्यथा हे तेच सोडवू शकतात, अशी मागणी यशवंत भोसले यांनी करताच सर्व उपस्थितांनी त्यास उत्स्फूर्त दाद दिली. पुढील बैठक सर्व जिल्हाधिकारी व महापालिकेचे आयुक्त व कामगार आयुक्त यांच्या उपस्थित घेऊ, अशी ग्वाही केल्विन यांनी दिली.
Web Title: Contract Waste Management Employees Should Be Paid Minimum Wage Pimpri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..