कोरोना रुग्ण संख्येबाबत पिंपरी महापालिका आयुक्तांचा अंदाज खरा ठरला, आज तो आकडा गाठला...

टीम ई सकाळ
मंगळवार, 30 जून 2020

  • पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संसर्ग तीन हजारावर 
  • मंगळवारी दुपारी साडेचारपर्यंत तीन हजार 31 जणांना लागण 
  • जूनमध्ये सर्वाधिक 2509 जणांना संसर्ग; रोज सरासरी 84 जण बाधित 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी मध्यरात्री बारापासून मंगळवारी दुपारी साडेचारपर्यंत 124 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या तीन हजार 32 झाली आहे. यात एक जूनपासून आढळलेले तब्बल दोन हजार 509 रुग्ण आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर व शहराला रेडझोनमधून वगळल्यानंतर रूग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. 11 मार्च ते 31 मेपर्यंत अवघी 522 असलेली रुग्णसंख्या जून अखेरपर्यंत तीन हजारावर गेली. 30 जून दुपारी साडेचार वाजेपर्यंत जून महिन्यात वाढलेल्या रुग्णांची संख्या दोन हजार 509 झाली आहे. या बाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात अंदाज वर्तवला होता की, अशा पद्धतीने रुग्ण वाढत राहिल्यास जूनखेरपर्यंत शहरातील रुग्ण संख्या तीन हजार होईल. अखेर त्यांचा अंदाज खरा ठरला आहे. आता आयुक्त म्हणताहेत, जुलैअखेरपर्यंत 10 हजारापर्यंत एकूण रुग्णसंख्या पोचेल. शहरवासीयांसाठी ही चिंतेची बाब आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वाधिक रुग्णवाढ दाट लोकवस्ती व झोपडपट्यांमध्ये होत आहे. यातील दापोडीतील सिद्धार्थनगर, गुलाबनगर, पवारवस्ती, निगडीतील रुपीनगर, ओटास्कीम, नेहरुनगर विठ्ठलनगर, पिंपरीतील भाटनगर, बौद्धनगर, चिंचवडमधील आनंदनगर, साईबाबानगर, आकुर्डीतील अजंठानगर या भागात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. रोज सरासरी दीडशे जण पॉझिटीव्ह आढळत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असली तरी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. मंगळवारी दुपारी साडेचारपर्यंत एक हजार 862 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या एक हजार 122 जणांवर उपचार सुरू आहेत. यातील 80 टक्के म्हणजेच जवळपास साडेनऊशे रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. आजपर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 39 मृत्यू जून महिन्यातील आहेत. हा मृत्यू दर कमी करण्यावर अधिक भर असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection in Pimpri-Chinchwad city over three thousand