कोरोना प्रतिबंधक लसीकरणात पुणे महापालिका काठावर पास 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला शनिवारपासून देशात सुरवात झाली. पुणे शहरातील आठ लसीकरण केंद्र त्यासाठी कार्यान्वित करण्यात आले. लसीकरणाचे दुसरे सत्र मंगळवारपासून सुरू झाले.

पुणे- कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या सत्रात पुणे महापालिका काठावर पास झाली. 600 पैकी जेमतेम 213 आरोग्य सेवकांनी (36 टक्के) मंगळवारी लस घेतली. त्यातही सर्वाधिक लसीकरण रूबी हॉल क्‍लिनिकमध्ये झाले. 

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला शनिवारपासून देशात सुरवात झाली. पुणे शहरातील आठ लसीकरण केंद्र त्यासाठी कार्यान्वित करण्यात आले. लसीकरणाचे दुसरे सत्र मंगळवारपासून सुरू झाले. या वेळी आठवरून सहा केंद्रांपर्यंत केंद्रांची संख्या कमी करावी लागली. दोन केंद्र कमी झाल्याचा थेट फटका शहरातील लसीकरणाला बसल्याचे दिसून आले. शहरात दिवसभरात 600 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात मात्र 213 जणांनीच लस घेतली, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात शनिवारी झालेल्या लसीकरणात 55 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली होती. ही टक्केवारी मंगळवारपर्यंत 19 ने घसरली. 

शहरातील टक्केवारी घसरण्यामागे "को-व्हिन' (कोव्हिड - व्हॅक्‍सिन इंटेलिजेंस वर्क) ऍप हे एक कारण असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. दुसरे कारण म्हणजे, शहरातील कमी झालेल्या केंद्रांची संख्या हे आहे. शहरात आठ केंद्र निश्‍चित केली आहे. त्यात महापालिकेच्या कमला नेहरू, सुतार हॉस्पिटल, सोनवणे प्रसूतिगृह आणि राज्य सरकारच्या ससून रुग्णालयाचा समावेश आहे. तसेच रूबी हॉल क्‍लिनिक, दीनानाथ मंगेशकर, नोबेल आणि भारती या खासगी रुग्णालयांमध्येही केंद्र आहेत. त्यापैकी मंगेशकर, नोबेल आणि भारती रुग्णालयातील केंद्र कार्यान्वित झाले नाहीत, असेही खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Success story: शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशा...

रुग्णालय व्यवस्थापनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे रुग्णालयातील बहुतांश सर्वजण लस घेत आहेत. 
- डॉ. कपिल झिरपे, रूबी हॉल क्‍लिनिक 

दृष्टिक्षेपात मंगळवारचे लसीकरण (कंसात शनिवारचे लसीकरण, सर्व आकडे टक्‍क्‍यांमध्ये) 
कुठे ................................. किती 
राज्य .............................. 52.68 टक्के (65) 
पुणे शहर ........................... 36 टक्के (55) 
पुणे ग्रामीण ........................ 61 टक्के (61) 
पिंपरी चिंचवड महापालिका ........ 57 टक्के (35) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona preventive vaccination Pune Municipal Corporation