निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून कोरोना नियमांची शहरात पायमल्ली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून कोरोना नियमांची शहरात पायमल्ली

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून कोरोना नियमांची शहरात पायमल्ली

पिंपरी - महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर बहुतांश इच्छुक स्वतःसह नेत्यांचे वाढदिवस, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, सण, उत्सव (Utsav) या निमित्ताने विविध जाहीर कार्यक्रम (Event) घेत आहेत. मात्र, कोरोना (Corona) प्रतिबंधक नियमांचे कुठेही पालन होताना दिसत नाही. ना कोणाच्या तोंडाला मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग असेच चित्र आहे. याकडे ना महापालिका प्रशासनाचे लक्ष आहे, ना पोलिसांचे. फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांकडून निर्माण होणार निवडणूक ‘फिव्हर’ आहे.

महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांसह अन्य इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदारांपर्यंत विशेषतः महिलांपर्यंत पोचण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कारणाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यांना पुरुषांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात राहात आहे.

असे आदर्श

दत्त जयंतीनिमित्त दरवर्षी सांगवीतील श्रीदत्त आश्रमात आठ दिवसांचा संगीत महोत्सव असतो. भजन, प्रवचन, कीर्तन, गायन असे कार्यक्रम होतात. परंतु, गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही प्रशासनाने कोरोनामुळे परवानगी दिली नाही. त्यामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थित कार्यक्रम केला. मिरवणूक व महाप्रसादही रद्द केला.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शहर शाखेच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवार व रविवार असे दोन दिवस कार्यक्रम झाले. त्यासाठीच्या प्रवेशिकांवर एक खुर्ची सोडूनच संयोजकांनी क्रमांक दिलेले होते आणि त्यानुसारच प्रेक्षक बसले असल्याची खात्रीही करून घेतली.

हेही वाचा: पिंपरी चिंचवड शहरातील ओमिक्रॉनच्या दहाही जणांना डिस्चार्ज

बंदिस्त कार्यक्रमांना नियम

सभागृह, नाट्यगृहांमध्ये सांगितिक, सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम होत आहेत. त्यांना नियमांनुसार ५० टक्के उपस्थितीसाठी परवानगी दिली जात आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी नाट्यगृहांमध्ये एक खुर्ची सोडून प्रेक्षकांना बसविले जात आहे. मास्क, सॅनिटायझर वापराबाबत सूचित केले जात आहे. मात्र, खुल्या कार्यक्रमांत सर्वच नियम पायदळी तुडवले जात आहेत. असाच एक कार्यक्रम नुकताच चिंचवड स्टेशन परिसरात पिंपरी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका शाळेच्या आवारात झाला. रात्री उशिरापर्यंत तुडूंब गर्दी होती. ना मास्क घातले होते. ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते.

मतदार नाही; बक्षीसही नाही

एका राजकीय पदाधिकाऱ्यातर्फे महिलांसाठी आयोजित स्पर्धात्मक कार्यक्रमाची अंतिम फेरी रात्री अकरा वाजता सुरू झाली. सात महिला स्पर्धेत होत्या. पहिले बक्षीस होते मोपेड. एक महिला जिंकली. बक्षीस वितरणाची प्रक्रिया सुरू झाली. पण, ती महिला आपल्या वॉर्डातील नसल्याची शंका एका कार्यकर्त्याला आली. ती खरी ठरली आणि बक्षीस नाकारले. त्या महिलेला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले आणि दुसऱ्या महिलेला संधी दिली. त्यामुळे ही स्पर्धा महिलांसाठी नसून निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतदारांना खूष करण्यासाठीचा खटाटोप असल्याची चर्चा आजही रंगली आहे.

एकीनेच पटकावल्या तीन साड्या

एका कार्यक्रमात एका विवाहितेने चक्क तीन साड्या जिंकल्या. मुख्य खेळाच्या उपउपांत्य फेरीपर्यंत मजल मारली म्हणून पहिली साडी पटकावली. पुढील फेरीचे नियम स्पर्धकांना समजावून सांगेपर्यंत प्रेक्षक महिलांना सूत्रसंवादकाने प्रश्न विचारले. बरोबर उत्तराला साडी बक्षीस होती. कोणत्या महिलेच्या हातात प्रत्येकी किमान एक डझन बांगड्या आहेत? ‘त्या’ महिलेने त्वरित दोन्ही हात दाखवत दुसरी साडी मिळवली. पुढचा प्रश्न होता, ‘कोणाच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सासूचा फोटो आहे?’ योगायोगाने ‘त्या’ महिलेच्या मोबाईलवरच सासूचा फोटो होता. तो दाखवून तिने तिसरी साडीही मिळवली.

Web Title: Corona Rules Trampled City Aspirants Wake Municipal Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top