esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेलाच ठेकेदाराकडून दमदाटी 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेलाच ठेकेदाराकडून दमदाटी 

कासारवाडीतील घटना; महापालिका सर्वसाधरण सभेत पडसाद, कारवाईची मागणी 

पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेलाच ठेकेदाराकडून दमदाटी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : खोदकामाचे कारण विचारणाऱ्या नगरसेविका आशा शेंडगे यांना ठेकेदाराच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दमदाटी केली. हा प्रकार शुक्रवारी (ता. 21) सकाळी कासारवाडीत घडला. त्याचे पडसाद दुपारी महापालिका सर्वसाधारण सभेत उमटले. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुलै व ऑगस्टची तहकूब सभा शुक्रवारी झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकांना ऑनलाइन सहभागी होण्याची व्यवस्था होती. सभेची सुरवात दमदाटीच्या मुद्यांवरून झाली. संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी करा, अन्यथा सभागृहात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेंडगे यांनी दिला. अन्य सदस्यांनीही कारवाईची मागणी केली. त्यामुळे पीठासन अधिकारी महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कारवाईबाबत आदेश दिला. 'लोकप्रतिनिधींना अशी वागणूक मिळत असेल, तर शंभर टक्के कारवाई केली जाईल,' असे आयुक्तांनी सांगितले. 

असा झाला प्रकार 

नगरसेविका आशा शेंडगे यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीनजिक शुक्रवारी सकाळी खोदकाम सुरू करण्यात आले. त्याबाबत विचारले असता, ठेकेदाराचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 'माहिती नाही', असे उत्तर देत माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यावर "सध्या पाऊस सुरू आहे. उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे खोदकाम करू नये,' असे शेंडगे यांनी सूचविले. मात्र, संबंधित व्यक्तींनी गावातील दहा-बारा माणसे गोळा करून 'आम्हाला काम करू देत नाहीत' असे म्हणत दमदाटी केल्याचा आरोप शेंडगे यांनी केला. 

नगरसेविकेचा कॉल व्हायरल 

महापालिका प्रभाग दहामधील कामांबाबत नगरसेविका सुजाता पलांडे यांनी अधिकाऱ्याशी (अभियंता) मोबाईलवरून चर्चा केली. मात्र, हा संभाषण अन्य लोकप्रतिनिधींना ऐकवून अधिकाऱ्याने व्हायरल केले. या बाबत सभागृहात जाब विचारत त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी पलांडे यांच्यासह अन्य सदस्यांनीही केली. पक्षनेते नामदेव ढाके यांनी कारवाईचे आदेश देण्याची मागणी केली. त्यावर महापौर ढोरे म्हणाल्या, "आपल्या वॉर्डातील कामांची माहिती व गरज संबंधित नगरसेवकांनाच असते. त्याबाबत विचारणा केल्यास सदस्याला दमदाटी करणाऱ्या व कॉल व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश आयुक्तांना दिला.'' 

गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांचे भाव कडाडले; पिंपरी-चिंचवडमधील आजचा भाव जाणून...

'पास्को'चा विषय तहकूब 

महापालिका व खासगी रुग्णालयांतील जैव वैद्यकीय कचरा संकलित करून प्रक्रिया करण्याचे काम पास्को कंपनी पंधरा वर्षांपासून करीत आहे. वायसीएम रुग्णालयाच्या आवारात प्रक्रिया केंद्र आहे. आणखी पंधरा वर्षे काम देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी ठेवला होता. त्याबाबत सविस्तर माहिती नगरसेवकांनी मांगितली. मात्र, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे माहिती देऊ शकले नाहीत. त्यावर, डॉ. साळवे माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून, हा विषय तहकूब ठेवण्याची मागणी भाजपसह विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही केली. त्यामुळे विषय तहकूब ठेवण्यात आला. 

ऑक्‍सिजनसाठी रुग्णांमध्ये भांडण 

कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्‍सिजन मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याचा आरोप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला. वायसीएम रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर ऑक्‍सिजनवरील एका रुग्णाचे निधन झाले. त्यानंतर या ऑक्‍सिजन सिलिंडर आपल्याला मिळावे, यासाठी अन्य रुग्णांमध्ये भांडण झाल्याच्या प्रकाराकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

डॉक्‍टर नियुक्तीवर आक्षेप 

वायसीएम रुग्णालयातील रिक्त पदांवर 20 डॉक्‍टरांची नियुक्ती प्रशासनाने केली आहे. त्यावरही नगरसेवकांनी आक्षेप घेतला व तज्ज्ञ डॉक्‍टरांऐवजी अनुभव नसलेले डॉक्‍टर घेतल्याचा आरोप केला. 
 

loading image
go to top