esakal | माणमध्ये होणार कोविड केअर सेंटर

बोलून बातमी शोधा

Covid Care Center
माणमध्ये होणार कोविड केअर सेंटर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी - कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून माण ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सोयीसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात बैठक झाली.

बैठकीत माण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मोकळ्या इमारती, प्राथमिक शाळा, समाजमंदिरे, सभागृह याविषयी चर्चा करून त्यांची उपलब्धता व उपयुक्ततेबद्दल माहिती घेतली. यावेळी मुळशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी प्रशासकीय व तांत्रिक बाबींबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर यांनी सेंटरसाठी लागणारी सर्वप्रकारची मदत करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच, महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या. आवश्यक त्या प्रशासकीय कामकाजाविषयी पूर्ण मदत करणार असल्याचे विस्तार अधिकारी सुनील जाधव व ग्रामविकास अधिकारी भरत पाटील यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी कोविड केअर सेंटरबाबत आपली मते व सूचना मांडल्या. तसेच, वाढत्या संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठीच्या कडक उपाययोजना, शंभर टक्के लसीकरणाबाबत चर्चा केली.

हेही वाचा: पिंपळे गुरवमध्ये पन्नास खाटांचे कोविड सेंटर; आमदार जगताप यांच्या प्रयत्नाला यश

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आयटीनगरी परिसरातील रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. सर्वच रुग्णालयात रुग्णांना जागा उपलब्ध होत नाही. गंभीर रुग्णांच्या नातेवाइकांना शोधाशोध करावी लागत असल्याने माण, हिंजवडीसह परिसरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या हितासाठी सकारात्मक पाऊल उचलल्याने समाधान व्यक्त केले आहे. यावेळी सरपंच अर्चना आढाव, उपसरपंच प्रदीप पारखी, ग्रामपंचायत सदस्य रवी बोडके, संदीप साठे, पंडित गवारे, शशिकांत धुमाळ, सचिन आढाव, नवनाथ पारखी, राम गवारे, शिवाजी भिलारे यांच्यासह निवडक ग्रामस्थ उपस्थित होते.

गावातच उपचाराची सोय

माण ग्रामपंचायत हद्दीत कोरोनामुळे मागील काही महिन्यांत अनेक ग्रामस्थ दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, सरकारी रुग्णालयातही जागा नाहीत व रुग्णांना त्यांच्या आवश्यकतेनुसार जागा नसल्यामुळे नातेवाइकांची दमछाक होते. या परिस्थितीने गावातील सगळेच नागरिक हतबल झाले आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटर सुरू झाल्याने ग्रामस्थांसाठी गावातच उपचारासाठी सोय होईल.

कोविड केअर सेंटरकरिता सीएसआर फंडातून मदत करण्यासाठी इन्फोसिस कंपनी पुढे आली असून, आम्ही तसा प्रस्तावही त्यांच्या व्यवस्थापनाकडे दिला आहे.

- पांडुरंग ओझरकर, सभापती, पंचायत समिती मुळशी