आकुर्डीतील स्टार रुग्णालयावर गुन्हा; कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही घेतले वाढीव भाडे 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची जादा दराने विक्री झाल्याची घटना आकुर्डी येथील स्टार रुग्णालयात घडली होती.

पिंपरी : अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची जादा दराने विक्री झाल्याची घटना आकुर्डी येथील स्टार रुग्णालयात घडली होती. आता कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही त्याच्या नातेवाइकांकडून अतिदक्षता विभागाचे वाढीव भाडे घेतल्याप्रकरणी फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. अमित वाघ व रोखपाल (नाव व पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

फिर्यादी मुस्तफा अब्दुलगफार तांबोळी (रा. पाटीलनगर, चिखली) यांच्या आई मुमताज तांबोळी (वय 37) यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने या रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने अतिदक्षता विभागात दाखल केले. उपचारादरम्यान 24 ऑगस्टला रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी मुमताज यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. तरीही रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाच्या बिलात 25 ऑगस्टपर्यंतचे बिल बनविले. यामध्ये स्वतः:च्या आर्थिक फायद्यासाठी लुबाडणूक करण्याच्या उद्देशाने रुग्णालयात बिल बनवून पैसे स्वीकारणाऱ्या एका व्यक्तीने फिर्यादीकडून व्हेंटिलेटरचे नऊ हजार रुपयांचे वाढीव बिल स्वीकारले. याप्रकरणी रुग्णालयाचे संचालक वाघ व बिल बनवून पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीवर निगडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

दुसरा प्रकार 
दरम्यान, याअगोदरही रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची जादा दराने विक्री करणाऱ्या तिघांविरोधात मुस्तफा तांबोळी यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार 23 सप्टेंबरला तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, आरोपींपैकी एकजण स्टार रुग्णालयातच काम करीत होता. त्याच्याकडे औषध विक्रीचा कोणताही परवाना नसताना त्याने या इंजेक्‍शनची वाढीव दराने विक्री केली. हा प्रकार स्टार रुग्णालयातच घडला. 
 
मृत्यूच्या चौकशीची मागणी 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचा या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तसेच तळवडे येथील एका राजकीय पक्षाच्या तरुण पदाधिकाऱ्याचाही या रुग्णालयात मृत्यू झाला असता त्यांच्याही मृत्यूच्या चौकशीची मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime at Star Hospital in Akurdi