
पीएमपीचा दैनिक आणि मासिक पास बंद
पिंपरी : एसटी महामंडळाची बससेवा अद्यापही बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने पीएमआरडीए व ग्रामीण हद्दीत बससेवा सुरु केली आहे. मात्र, एसटीच्या तुलनेत तिकीट दर कमी असल्याने पीएमपीएल प्रशासनाला उत्पन्न कमी मिळत आहे. यामुळे, एसटीच्या दराप्रमाणे प्रती किमी १.४६ रुपये प्रमाणे तिकीट दर केला आहे. तसेच, पुणे ग्रामीण हद्दीत दैनिक पास ७० रुपये व मासिक पास १४०० रुपये एक एप्रिलपासून बंद करण्यात केला आहे.
संचालक मंडळाच्या ७ सप्टेंबर २०२०मध्ये झालेल्या बैठकीत ग्रामीण भागातील बस सुरु करण्यात मान्यता मिळाली. तसेच, पीएमआरडीए हद्दीपर्यंत बस विस्तार करण्याचा निर्णय ९ डिसेंबरला झालेल्या विभागीय आयुक्त यांच्या बैठकीत झाला. पीएमपीएल प्रशासनाने एसटीचे पल्ले लांबचे असल्याने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. पुणे ग्रामीण व पीएमआरडीए भागातील उत्पन्नामधील तोटा कमी करण्याच्या दृष्टीने पुणे महापालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट २३ गावांच्या हद्दीच्या पुढे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या ५ किलोमीटर अंतरापुढे तिकीट दरात फेरबदल करण्यात आला आहे. ज्या प्रवाशांना १४०० रुपयांचा आधी पास वितरित केला आहे. त्या पासची मुदत संपेपर्यंत सेवा सुरु राहणार आहे.
पुणे ग्रामीण, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरी भाग हा पूर्णपणे एकमेकांशी जोडला गेला आहे. त्यामुळे, शहरी हद्दीत चालणारा ७० रुपयांचा पास हा ग्रामीण भागात चालणार नाही. तसेच, महिन्याचा १४०० रुपयांचा पास हा शहरात सुरू आहे. मात्र, तो ग्रामीणला चालणार नाही. परंतु, नागरिकांच्या दृष्टीने शहरातून ग्रामीण व ग्रामीणमधून शहरात विविध काम व नोकरीनिमित्त तसेच शाळा व कॉलेजसाठी ये-जा करत असतात. त्यांची पंचाईत झाली आहे.
एमएसआरटीसी दराप्रमाणे पीएमपीचे दर ग्रामीण भागासाठी केले आहेत. ग्रामीण भागातील हद्दीपुरता पास बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
- चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएल, पुणे
पीएमपीने ७० रुपयांचा पास बंद करायला नको होता. मी वाघोलीहून चिंचवडला ये-जा करणार असून, अशावेळी ग्रामीणमधून शहरात येत असताना पास चालणार नाही. त्यामुळे मोठी गोची होणार आहे.
- योगेश शिंदे, प्रवासी, चिंचवड
देहूमधून पुण्याला दररोज नोकरीनिमित्त ये-जा करावी लागते. महिन्यातून चार रविवार सुट्ट्या असतात, तर इतर दिवशीही काही सुट्ट्या येतात. त्यामुळे पास काढणे परवडत नाही. अशावेळी दिवसाचा पास मी काढते. मात्र, तो ही बंद करण्यात आल्यास खिशाला चाट बसणार आहे. ग्रामीण भागासाठी पास बंद करणे चुकीचे आहे.
- जेनिफर लुथेर, प्रवासी
Web Title: Daily And Monthly Passes Of Pmpml Closed Pimpri Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..