स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडबद्दल महापौर म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

कोरोनासारख्या महासंकटावर मात करून या औद्योगिक नगरीला पूर्वपदावर आणू, असा विश्‍वास महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. इथला कष्टकरी कामगार हा शहराचा पाठकणा आहे. लॉकडाउनमुळे शहरातील उद्योगधंद्यांवर परिणाम झाला असला, तरी लवकरच आपण कोरोनासारख्या महासंकटावर मात करून या औद्योगिक नगरीला पूर्वपदावर आणू, असा विश्‍वास महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त महापौर ढोरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्या वेळी त्या बोलत होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात हुतात्म्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्या म्हणाल्या, की इथल्या मातीमध्ये संतांची शिकवण रुजलेली आहे. या मातीने अनेक समाजसुधारकांना जन्मास घातले. पुरोगामी विचारांची दिशा याच मातीने देशाला आणि अवघ्या विश्वाला दिली. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले समर्पण देणाऱ्या प्रत्येकाच्या त्यागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कामगारांनी आणि कष्टक-यांनी या भूमीला आपल्या घामाने फुलवले.

शहराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. इथल्या उद्योगधंद्यांनी या नगरीला वैभवशाली बनवले. शहरातील कष्टकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, पोलिस, सैनिक, डॉक्टर, इंजिनियर, संशोधक, खेळाडू, कलावंत, साहित्यिक अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून आजची औद्योगिक नगरी घडली आहे. या शहराला स्मार्ट सिटी बनविणाऱ्या या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या कोरोनामुळे महापालिकेची सर्व यंत्रणा जोखीम पत्करून कर्तव्य पार पाडत आहे. महापालिकेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार यांच्यासह पोलिस यंत्रणादेखील जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून महापौर ढोरे म्हणाल्या, की बेघर, दिव्यांग, मजूर आदींसाठी महापालिकेने शहरातील विविध भागात स्वतंत्र निवाऱ्याची जेवणासह मोफत व्यवस्था केली आहे. शिवाय गरजूंना मोफत अन्न वाटप करण्यासाठी शहरातील अनेक संस्था आणि दानशूर व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका यात समन्वयाची भूमिका बजावत आहे. या माध्यमातून शहरात दररोज सरासरी ७५ हजार गरजू व्यक्तींना अन्न वाटप केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान, सहभाग देत आहे. सरकार आणि महापालिकेने कोरोना आजाराबाबत वेळोवेळी विविध सूचना आणि आदेश दिले आहेत. त्याचे पालन केले जात आहे.  नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरात रहावे, स्वत:ची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी‌. 

 महाराष्ट्र राज्याचा हिरक महोत्सव साजरा होत असताना आज सार्‍या जगावर कोवीड १९ अर्थात कोरोना साथीचे संकट ओढावले आहे. यातून आपण सर्वच जण लवकर बाहेर पडू असा आशावादही महापौर ढोरे यांनी व्यक्त केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daily Meals for 75 thousands people in pimpri chinchwad city