डांगे चौक, वाकड रस्त्यावरील वाहतूक कोंडीत विद्यार्थ्यांची होतेय फरफट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dangerous Transport

वाकड, थेरगाव परिसरातील रस्त्यांवर सकाळी साडेअकरानंतर अचानक विद्यार्थीच विद्यार्थी दिसू लागतात; स्कूल बस, रिक्षा, दुचाकी, सायकल व मोटारींनी रस्ता ओसंडून वाहू लागतो.

Traffic : डांगे चौक, वाकड रस्त्यावरील वाहतूक कोंडीत विद्यार्थ्यांची होतेय फरफट

वाकड - वाकड, थेरगाव परिसरातील रस्त्यांवर सकाळी साडेअकरानंतर अचानक विद्यार्थीच विद्यार्थी दिसू लागतात; स्कूल बस, रिक्षा, दुचाकी, सायकल व मोटारींनी रस्ता ओसंडून वाहू लागतो. ही गर्दी भेदत, रस्ता ओलांडून शाळा गाठण्याची कसरत विद्यार्थी करत राहतात. हे नित्य चित्र वाकड, थेरगावातील अनेक चौकांत पाहायला मिळते.

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून...

 • मोठे विद्यार्थी, शिक्षक यांच्या समन्वयाने वाहतुकीवर नियंत्रण

 • शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना रांगेत टप्प्याटप्प्याने सोडा

 • प्रत्येक मजल्यावरील वर्ग क्रमाक्रमाने सोडा

 • विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना मैदानात पार्किंगसाठी जागा द्या

 • एकाच परिसरात असणाऱ्या शाळांनी भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत अंतर ठेवा

 • काही पालकांनी स्वतःहून पुढाकार घेत विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करा

 • वाहतूक पोलिस किंवा ट्रॅफिक वॉर्डनची मदत घ्या

पोलिस प्रशासनाने अशा प्रमुख चौकांत वाहतूक पोलिस तैनात करावेत. शाळांनी पालकांची वाहने आणि स्कूल बस यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहे. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत रस्ता ओलांडण्यासाठी महापालिका प्रशासन व शाळांनी मिळून प्रमुख चौकात वॉर्डन नियुक्त करावेत. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी मिळून या दोन वेळांसाठी वाहतुकीसाठी वेगळी नियमावली तयार करावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना सोईस्कर होईल. शाळेने देखील खबरदारीच्या योग्य त्या उपाय योजना आखल्या पाहिजेत

- संज्योग जैन, वाकड

धावडे वस्तीजवळील पुणे-नाशिक महामार्गावर भुयारी अथवा पादचारी पूल बांधणे गरजेचे आहे. वर्दळीच्या रस्त्याजवळ शाळेचे सुरक्षा रक्षक अथवा शिपायांनी विद्यार्थ्यांनी रस्ता ओलांडण्यासाठी मदत करावी. त्याचप्रमाणे शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत वाहतूक पोलिसांचीही नियुक्ती महामार्गावर करावी. शाळेजवळील रस्त्यावरील रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगसह ब्लिंकर वाहतूक दिवे आणि रिफ्लेक्टर बसविणे गरजेचे आहे.

- नारायण तोटे, चक्रपाणी वसाहत, भोसरी

पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरातील शाळांबाहेरील आवारात रिक्षा थांबे, टपऱ्या असल्यामुळे रिक्षा व अवजड वाहनांना विशिष्ट मार्गावर बंदी आणणे गरजेचे आहे. अतिक्रमणाच्या विळख्यातून पदपथ रिकामा केल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित पदपथावर चालता येईल, शाळेकडे जाणारे अरुंद असलेले दुतर्फा रस्ते एकतर्फी केल्यास वाहतूक कोंडी टळेल. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिस असावेत, शाळा परिसरात ‘नो पार्किंग’ झोन असावा. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल व्यवस्था असणे गरजेची आहे.

- गजानन धाराशिवकर, पिंपळे गुरव

डांगे चौक-वाकड रस्ता, शिव कॉलनी परिसर

या रस्त्यावर इंग्रजी, मराठी माध्यमांच्या, तसेच महापालिकेच्या पंधराहून अधिक शाळा आहेत. दुपारी पावणेबारा ते सव्वाबारापर्यंत रस्त्याला विद्यार्थ्यांचा महापूर येतो. इतके दिवस रस्त्याचे काम सुरू असल्याने विद्यार्थ्यांना शाळा गाठताना अग्निदिव्यातून जावे लागत होते. आता रस्ता प्रशस्त झाला पदपथही आले, मात्र रस्ता ओलांडण्यासाठी कुठल्याही सुरक्षिततेच्या उपाय योजना नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचाही जीव येथे दररोज टांगणीला लागतो.

वाहतूक कोंडीत विद्यार्थ्यांचा कोंडमारा

पिंक सिटी रस्त्यावरील युरो किडस शाळेत सुमारे दोन हजारांवर विद्यार्थी आहेत. आयटीत नोकरी करणारे पालक पाल्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी मोटारी वापरतात आणि हेच येथील वाहतूक कोंडीचे मुख्य कारण बनले आहे. दररोज सकाळी शाळा भरताना आठ ते नऊ आणि शाळा सुटताना अडीच ते साडेतीन या वेळेस सुमारे तासभर वाहतुकीचा खेळखंडोबा होतो. हॉर्न वाजवत रस्ता काढणाऱ्या पालकांच्या आलिशान मोटारींची रांग आणि कोंडीत अडकलेल्या स्कूल बसमधील विद्यार्थ्यांची घालमेल होते.

महामार्गापलीकडच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप

मुंबई-बेंगळुरू महामार्गापलीकडे प्रचंड विकास झाला आहे. असंख्य गृहप्रकल्प आले. पर्यायाने अनेक तारांकित शाळाही आल्या. त्या मानाने रस्ते विस्तारलेले नाहीत. काही भागात रस्त्यांची सुरू असलेली कामे आणि भूमकर चौकातील नेहमीची वाहतूक कोंडी विद्यार्थी व पालकांना मोठा मन:स्ताप देत आहे. येथील शनी मंदिर चौक ते मारुंजी शिव पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. याच भागात इंदिरा, अक्षरा, युरो आदी मोठ्या शाळा आहेत. बेशिस्त पार्किंग, चालकांना वाहतूक नियमांचे वावडे यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना विद्यार्थ्यांची दमछाक होते.

ताथवडे चौक-अशोकनगर झोपडपट्टी

ताथवडे परिसरात मुंबई-बंगळूर महामार्गाच्या दोनही बाजूंना सुमारे पंधराहून अधिक मोठ्या शाळा आहेत. येथील अशोकनगर झोपडपट्टी जवळील कमी उंचीचा भुयारी मार्ग सर्वांची डोकेदुखी ठरत आहे. तर ताथवडे चौकात जिल्हा परिषदेची तसेच मराठी व इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा आहेत. येथून औंध-रावेत हा सुसाट वाहणारा बीआरटी मार्ग गेला आहे. त्यामुळे रस्ता ओलांडून शाळा गाठताना विद्यार्थ्यांना मोठी जोखीम घेऊन ये-जा करावी लागते

या उपाययोजना कायमस्वरूपी करा

 • शाळा परिसरात ‘नो पार्किंग’ झोन

 • बस थांबे शाळेपासून काही अंतरावर

 • शाळेसमोर वाहतूक नियमाचे फलक

 • गतिरोधक उभारणे

 • झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे

 • शाळेसमोर ‘स्काय वॉक’

 • फूट ओव्हरब्रीज

 • पालकांची स्वयंशिस्त

टॅग्स :studentwakadTraffic