जीवघेणे होर्डिंग ः लोगो
‘आयटी’नगरीत नियमावलीला तिलांजली

जीवघेणे होर्डिंग ः लोगो ‘आयटी’नगरीत नियमावलीला तिलांजली

हिंजवडी, ता. १६ : आयटी पार्क हिंजवडी पंचक्रोशीत होर्डिंग्जबाबत अद्याप ठोस नियमावली व धोरण नाही. या भागातील अनेक पेट्रोल पंपांलगत व उंच इमारतींवर महाकाय बेकायदा होर्डिंग्जचे जीवघेणे पीक आले आहे. याला पायबंद घालण्याऐवजी खतपाणी घालण्याची ‘पीएमआरडीए’ प्रशासनाची (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) भूमिका आहे का? शिवाय, हे होर्डिंग्ज आयटीयन्ससह स्थानिक नागरिकांसाठी धोकादायक असल्याने प्रशासन घाटकोपरची पुनरावृत्ती होण्याची वाट बघतेय का? असे प्रश्‍नही उपस्थित केले जात आहेत.
‘होर्डिंग कितीही मोठे करा, मात्र आम्हाला कर द्या,’ अशी भूमिका असल्याने पीएमआरडीए प्रशासन महाकाय धोकादायक होर्डिंग्जला पाठबळ देत असल्याचा आरोप होत आहे. संपूर्ण हिंजवडी आयटी परिसरात सुमारे तीनशेहून अधिक विनापरवाना धोकादायक होर्डिंग्ज आहेत. प्रचंड वर्दळीच्या चौकांत असलेले होर्डिंग्जचे सांगाडे मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. यापैकी काही होर्डिंगधारकांना चार महिन्यांपूर्वी केवळ नोटीस बजावल्या. ‘होर्डिंग नोंदणीकृत करा अथवा ते काढून घ्या’, अशा सूचना करण्याचे केवळ सोपस्कार पीएमआरडीए करीत आहे. तीन महिने उलटूनही अद्याप कारवाईची हिंम्मत त्यांनी केलेली नाही.

ठोस नियमावली नाही
होर्डिंग साईजबाबत कोणतीही ठोस नियमावली अथवा निश्चित धोरण पीएमआरडीएकडे नाही. त्यामुळे हिंजवडी आयटी परिसरातील प्रमुख रस्ते, मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे महाकाय होर्डिंगने अक्षरशः झाकोळले आहेत. ‘आयटी’तील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना होर्डिंग्जची जणू चढाओढ सुरू आहे. मोघम व अतिरिक्त लांबी, रुंदी व उंचीचे होर्डिंग अपघातांना निमंत्रण देत आहेत. ‘आयटीतील रस्त्यावर २४ तास मोठी वर्दळ असते. सध्या अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांचे दिवस असल्याने होर्डिंग कोसळून घाटकोपरची पुन:रावृत्ती होऊन मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.’ महापालिकेने ४० बाय २० फूट लांबी-रुंदीची मर्यादा दिली आहे. तर त्यालगत असलेल्या पीएमआरडीएने आकाराबाबत कोणतीच मर्यादा न ठेवल्याने १०० फूट बाय ४० फुटांचे महाकाय होर्डिंग जीवघेणे ठरू शकतात. प्रतिफूट ६० रुपये कर लावताना सुरक्षितता वाऱ्यावर सोडून केवळ पैसे उकळण्याचे धोरण ‘पीएमआरडीए’ने अवलंबल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

मोठ्या अपघातांना निमंत्रण
हिंजवडी भागात बेकायदा व विनपारवाना होर्डिंग व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल सुरू आहे. वाकड-हिंजवडी रस्त्यावरील मधुबन हॉटेल सोडताच फुकटच्या महाकाय होर्डिंगची शर्यत लागली आहे. आयटी पंचक्रोशीत एकशे बढकर एक महाकाय होर्डिंगने रस्ते व्यापले आहेत. माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई गावातील रस्ते व चांदे-नांदे, हिंजवडी-वाकड रस्ता, हिंजवडी माण रस्ता, लक्ष्मी चौक, जगताप चौक, म्हसोबा कॉर्नर याठिकाणचे रस्ते दुतर्फा होर्डिंग्जने व्यापले आहेत. ही बाब आयटीच्या विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरत असताना मोठ्या अपघातालाही निमंत्रण देत आहे.

होर्डिंग दुर्घटना टाळण्यासाठी
ज्या होर्डिंगवर जाहिरातीचे कापड किंवा पीव्हीसी होते तेच होर्डिंग आजवर कोसळले आहेत. वाऱ्याच्या दबावामुळे कापडावर येणारा ताण व तो ताण लोखंडी स्ट्रक्चरवर परावर्तीत होऊन स्ट्रक्चर पूर्णपणे रस्त्यावर कोसळून जीविताची हाणी होण्याची संभावना असते, सर्व दुर्घटना याच पद्धतीने घडल्या आहेत. यावर उपाय म्हणून प्रशासनाने होर्डिंगसाठी वापरण्यात येणारे कापड किंवा पीव्हीसीच्या जीएसएमसंदर्भात काही अंशता तत्त्वे लागू करण्याची गरज आहे. जेणेकरून नेहमीपेक्षा जास्त वेगाने वाहणारे वारे आल्यावर कापडावर येणारा ताण लोखंडी स्ट्रक्चरवर परावर्तित होण्याच्या अगोदर कापड लगेच फाटून वाऱ्याला वाट मोकळी झाल्यास पुढील होणारी दुर्घटना कायम टळू शकते. हे काम प्रशासनातील उच्चशिक्षित इंजिनिअर करू शकतात. अगदी आपण गाडीत वापरत असलेल्या एअर बॅगसारखे तंत्रज्ञान आहे.

होर्डिंगसाठी वापरात असलेले कापड व पीव्हीसी संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी करायहा हवेत. होर्डिंग्जसाठी त्याच कापडाचा व पीव्हीसीचा वापर करायला हवा, अशी सूचना संबंधितांना पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए प्रशासन करू शकते. यामुळे भविष्यातील दुर्घटना टळू शकतात.
- काळूराम नढे, सदस्य, पुणे जिल्हा नियोजन समिती

हिंजवडी आयटी पार्कमध्ये घाटकोपरपेक्षा भयंकर घटना घडू शकते, याला पीएमआरडीएचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असतील. कारण लाचखोर अधिकारी कारवाईच करीत नाहीत. महाराष्ट्रात सरकार यंत्रणा चालवते आहे की सरकारी यंत्रणा सरकारला फरपटत नेते. लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसते.
- अंकुश जगताप, सामाजिक कार्यकर्ते, मारुंजी


फोटो संतोष हांडे देत आहेत याची नोंद घ्यावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com