पुणे-नाशिक महामार्गावरील 'ही' धोकादायक वाहतूक थांबणार का? स्थानिक रहिवाशांचा सवाल 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

  • सेवारस्ता, पादचारी पूल नसल्याने नागरिकांचा जीव धोक्‍यात 

भोसरी : "सद्‌गुरूनगरकडे जाण्यासाठी सेवारस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गाने जीव धोक्‍यात घालून उलट्या दिशेने जावे लागते. हा एकमेव मार्ग असतानाही काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. वाहनांची वर्दळ अधिक असल्याने महामार्ग ओलांडण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे लागतात. चार महिन्यांपूर्वी हवेली चौकात रस्ता ओलांडताना एका महिलेचा मृत्यू झाला,'' असे स्थानिक रहिवासी ऍड. तुषार रेटवडे सांगत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भोसरी एमआयडीसीतील कामगार हे चक्रपाणी वसाहत व सद्‌गुरूनगर भागात राहतात. या भागातून एमआयडीसी परिसरात जाण्यासाठी कामगारांना पुणे-नाशिक महामार्ग ओलांडावा लागतो. महामार्गाजवळ सेवारस्ता आणि पादचारी पूल नसल्याने नागरिकांना जीव धोक्‍यात घालवा लागतो. परिणामी सद्‌गुरूनगमधील रहिवासी हवेली हॉटेलजवळील चौकातून उलट दिशेने मुख्य महामार्गाने जातात. त्याचप्रमाणे 'इ' क्षेत्रीय कार्यालयातून भोसरीत जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटर पुढे जाऊन स्पाइन रस्ता चौकाला वळसा घालून जावे लागते. त्यामुळे वाहनचालक उलट दिशेनेच भोसरीत येतात. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एक अधिकाऱ्याने सांगितले, "नाशिक फाटा ते इंद्रायणी नदीपर्यंत रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाची प्रक्रिया सुरू आहे. येत्या सहा महिन्यात कामाच्या तांत्रिक बाबी पूर्ण होतील. त्यात सेवा रस्त्यांचाही समावेश आहे.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे-नाशिक महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम केवळ कागदावरच आहे. नागरिकांना लांडगेनगरवरून भोसरीत येण्यासाठी दीड किलोमीटरील स्पाइन रस्ता चौकात जाऊन यू-टर्न घ्यावा लागतो. 
- सूरज लांडगे, सामाजिक कार्यकर्ते 

सेवा रस्त्याअभावी विद्यार्थी, महिला, कामगार यांना महामार्ग ओलांडणे जीवावर बेतू शकते. पुणे-नाशिक महामार्गाच्या सहा पदरीकरणाचा रखडलेला प्रश्न सरकारने तातडीने मार्गी लावला पाहिजे.
- रवि लांडगे, नगरसेवक

सेवारस्ता, पूल नसलेला महामार्गालतचा परिसर 

सद्‌गुरूनगर, चक्रपाणी वसाहत, लांडगेनगर, धावडेवस्ती, महादेवनगर, गुरूविहार, पांजरपोळ, जयगणेश साम्राज्य 

  • सेवारस्ता, पादचारी पूल नाही 
  • महामार्गावर उलट्या दिशेने वाहतूक 
  • रस्ता ओलांडताना अपघाताची शक्‍यता 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dangerous road crossing on pune-nashik highway at bhosari