esakal | दापोडीवासियांनो मिळकत करऐवजी झोपडपट्टी सेवा कर भरा !
sakal

बोलून बातमी शोधा

tax

Pimpri : दापोडीवासियांनो मिळकत करऐवजी झोपडपट्टी सेवा कर भरा !

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेच्या कासारवाडी करसंकलन विभागाने दापोडी झोपडपट्टीनजीकच्या खासगी मिळकतधारकांना मिळकत करऐवजी झोपडपट्टी सेवाकर भरण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे अचानक दिलेल्या नोटीसामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. त्यांनी थेट आयुक्तांकडे दाद मागितली आहे

महापालिकेच्या कासारवाडी करसंकलन विभागाच्या अखत्यारित असलेल्या दापोडीतील सर्वे क्रमांक ६८ ते ७८ या भागात संमिश्र लोकवस्ती आहे. या परिसरात गुंठा, एक गुंठा जागा विकत घेऊन, घरे व चाळ बांधलेल्या खासगी मिळकत धारकांची संख्या सुमारे दोन हजारांच्या आसपास आहे. गेली ४० वर्षांपासून स्वमालकीच्या घरात राहणारे ते मिळकत कर भरत आहेत. तर या मिळकतधारकांच्या आसपासच्या परिसरातच झोपडपट्टी असून, यामध्ये सुमारे एक हजार झोपडपट्टीधारकांचा समावेश आहे. मात्र, यंदा महापालिकेच्या कासारवाडी कर संकलन विभागाने या नागरीकांना मिळकतकराची पावती न देता झोपडपट्टी सेवा कर भरण्याची नोटीस बजावली आहे.

त्यामुळे हे नागरिक कमालीचे हैराण झाले. आम्हाला झोपडपट्टी सेवा कर अचानकपणे कसा लागु केला? याबाबत नागरिकांनी कर संकलन कर्मचाऱ्यांना विचारणा केली. त्यांनी याठिकाणचे कोणते मिळकतधारक मालमत्ता कर भरतात कोणते रहिवासी झोपडपट्टी सेवा कर भरतात, याचा शोध लागत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्‍तांच्या आदेशानुसार या नोटीसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती दिली. मात्र, मिळकत कर भरल्याच्या जुन्या पावत्या दाखविल्यानंतरही हे कर्मचाऱ्यांनी ऐकूण घेतले नाही.

१९ वर्षे महापालिकेकडून सर्व्हे नाही

दापोडीचा २००२ मध्ये पुणे महापालिकेतून पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश झाला. तेव्हा या परिसराचा सर्व्हे केला होता. त्यानंतर अद्याप महापालिकेने याठिकाणचा सर्व्हे केलेला नाही. सर्व्हे न करताच झोपडपट्टी कोणती ? आणि मिळकतकर नोंद असलेली कोणती ? याची विभागणी कशी होणार ? त्यामुळे कोणत्या निकषांवर खासगी मिळकतधारकांना झोपडपट्टी सेवा कर लागू केला आहे. जिथे झोपडपट्टी आहे, तिथे सेवाकर भरा आणि मिळकतधारकांकडून कर घ्या, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

‘‘खासगी मिळकतधारकांची गणना झोडपट्टीधारकांमध्ये करु नये, या मागणीसाठी आम्ही आग्रही आहोत. महापालिकेने नियोजन पध्दतीने झोपडपट्टीचा सर्व्हे करावा. या परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळासह महापालिका आयुक्‍त राजेश पाटील यांची भेट घेतली आहे. या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे आयुक्‍तांनी आम्हाला आश्‍वासन दिले आहे.’’

-चंद्रकांता सोनकांबळे, माजी नगरसेविका

loading image
go to top