धक्कादायक : रावेत बंधाऱ्यात पुन्हा आढळले मृत मासे 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

काही कंपन्यांमधील रसायनयुक्त सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जात आहे. त्यामुळे माशांचा मृत्यू होत आहे.

पिंपरी : पवना नदीवरील रावेत बंधारा. पुनावळे व रावेत गावे जोडणारा. शहरासाठी अशुद्ध जलउपसा येथूनच होतो. सांगवडेपासून बंधाऱ्यापर्यंत अनेक नाले नदीला मिळतात. त्या माध्यमातून रसायनयुक्त पाणी मिसळले जाते. त्यामुळे जलप्रदूषण वाढले असून, मासे मृत्युमुखी पडत आहेत. रविवारीही हजारो मृत मासे तरंगताना आढळले. पर्यावरणप्रेमींनी ते पाण्यातून बाहेर काढले. मासे मृत होण्याची ही आठ दिवसातील तिसरी घटना आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

काही कंपन्यांमधील रसायनयुक्त सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जात आहे. त्यामुळे माशांचा मृत्यू होत आहे. या बाबत महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. तीन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे मासे मृत्युमुखी पडल्याचे आढळले होते. त्यावेळी महापौर उषा ढोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. त्यानंतर तीनच दिवसांनी पुन्हा मृत मासे आढळले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजच्या घटनेबाबत विशाल भोंडवे यांनी आयुक्तांकडे ई-मेलद्वारे तक्रार केलेली आहे. ते म्हणाले, "रावेत बंधाऱ्यात पुनावळेतील राम मंदिराच्या मागील बाजूस मृत मासे आढळले आहेत. मामुर्डी, किवळेपासून अनेक कंपन्यांतील सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण वाढले आहे. हे दूषित पाणीच पिंपरी-चिंचवड, वाघोली, हिंजवडीसाठी पुरवले जात आहे. नदीत रसायनयुक्त सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करायला हवी.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dead fish found again in ravet bund