मांत्रिकाकडे उपचार करून घेतल्याने गर्भवतीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 February 2021

रुग्णालयात उपचार करण्याऐवजी मांत्रिकाकडून उपचार करून घेतल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. महिलेचा भाऊ संतोष अशोक मगर (रा. बऊर, ता. मावळ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पवनानगर - रुग्णालयात उपचार करण्याऐवजी मांत्रिकाकडून उपचार करून घेतल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. महिलेचा भाऊ संतोष अशोक मगर (रा. बऊर, ता. मावळ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

शिळींब येथील दीपाली महेश बिडकर (वय २३) हिचा अकरा महिन्यांपूर्वी महेश बिडकर यांच्याशी विवाह झाला. दीपाली गर्भवती असताना सासरकडील मंडळींकडून तिचा वारंवार छळ केला जात होता. तिला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याऐवजी त्यांनी तिच्यावर मांत्रिकाकडून उपचार करून घेतले. त्रासाबद्दल दीपालीने माहेरच्या लोकांना कळविले होते. त्यानुसार तिला दहा फेब्रुवारीला तळेगावातील जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचाराला उशीर झाल्याने दीपालीची प्रकृती खालावली. त्यातच तिचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दीपालीच्या माहेरच्या लोकांनी याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे दाद मागितली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, पांडुरंग तिखे आदींनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधात पती महेश रघुनाथ बिडकर, रघुनाथ रामचंद्र बिडकर, जिजाबाई रघुनाथ बिडकर, मोहन रघुनाथ बिडकर, बकुळा मोहन बिडकर (सर्व रा. शिळींब, मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे पुढील तपास करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंधश्रद्धेमुळे निष्पाप आई व जन्माला येणाऱ्या बाळ या दोघांचा निष्पाप बळी गेला आहे. त्यामुळे अंधश्रध्दाविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे.
- मिलिंद देशमुख, राज्य प्रधान सचिव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a pregnant woman due to treatment by a Magical