चोर समजून घरात ठेवलं होतं बांधून; सकाळी पाहतात तर...

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 18 August 2020

घरात शिरलेल्या तरूणाला चोर समजून नागरिकांनी मारहाण करत बांधून ठेवले

पिंपरी- घरात शिरलेल्या तरूणाला चोर समजून नागरिकांनी मारहाण करत बांधून ठेवले. बांधून ठेवलेल्या या मजूराचा अचानक मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.18) सकाळी सहाच्या सुमारास भोसरी येथे घडली. शवविच्छेदन अहवालात मजूराचा मृत्यू हदयविकारामुळे झाल्याचे समोर झाले आहे. दरम्यान, तरूणाला घरात बांधून ठेऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णवाढ घटली; संपूर्ण परिस्थितीची माहिती...

संतोष महादू हौसे (वय 36, रा. दिघी) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेली माहिती अशी, संतोष हा मजूरीचे काम करीत होता. मंगळवारी सकाळी तो भोसरी गावठाणात एका नागरिकाच्या घरात शिरला. त्यावेळी त्याने मद्यपान केलेले होते. दरम्यान, चोर समजून नागरिकांनी आरडा-ओरडा केला. त्यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी त्याला मारहाण करून घरात बांधून ठेवले. भोसरी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिस घरी आले असता संतोष बेशुद्धावस्थेत आढळला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. संतोषच्या अंगावर मारहाणीच्या खूणा आढळून आल्या नाहीत. दरम्यान, शवविच्छेदनात संतोषचा मृत्यू हदयविकारामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. 

दरम्यान, संतोषला घरात बांधून ठेऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून अधिक तपास सुरू असल्याचेही अवताडे यांनी सांगितले. भोसरी पोलिस तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a young man in pimpari thief