Video : पिंपरीतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार आयुक्तांना म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

पिंपर-चिंचवड महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना, व्यवस्थापन आणि नियोजनाबाबतची माहिती त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून घेतले. 

पिंपरी : "कोरोना हा आजार घाबरून जाण्यासारखा नसून आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेतली, स्वच्छता राखली, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केल्यास सामुदायिक शक्तीच्या जोरावर या संकटातून आपण निश्‍चितपणे बाहेर पडू,'' असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच, पिंपर-चिंचवड महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना, व्यवस्थापन आणि नियोजनाबाबतची माहिती त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून घेतले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या विविध कामकाजाचा आढावा अजित पवार यांनी घेतला. तसेच, मुख्य प्रशासकीय इमारतीत केलेल्या वॉररूमची पाहणी केली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वॉररूममार्फत सुरू असलेल्या कामकाजाची व महापालिका कार्यक्षेत्रात केलेल्या विविध उपाययोजना, व्यवस्थापनाची माहिती दिली. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या, रुग्णवाहिका, शहरातील उपलब्ध खाटांची संख्या, कोरोना टेस्टिंग लॅब्सची माहिती, महापालिका तसेच खाजगी रुग्णालयात कोरोना संदर्भात असलेल्या सुविधांची माहिती, शहरातील उद्योगांसाठी येणाऱ्या अडचणी आदी विषयांबाबत पवार यांनी माहिती घेतली. तसेच, पुढील काळातील आवश्‍यकता लक्षात घेवून आवश्‍यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही आयुक्त हर्डीकर यांना केली. कोरोना संसर्ग तपासणीसाठी आवश्‍यक वैद्यकीय चाचणी केंद्र महापालिकेने वायसीएम रुग्णालयात सुरू केले आहे. यासाठी शासनामार्फत आवश्‍यक ते सहकार्य देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनच्या काळामध्ये चांगले सहकार्य केल्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभार मानले. काही नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे अडचणी उद्भभवत असल्याचे नमूद करून पवार म्हणाले, "कोरोना विरोधात लढण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, अनेक सामाजिक संस्था चांगले काम करत आहे. कोरोनाच्या या संकटकाळामध्ये माणसांना आधार देऊन त्यातून त्यांना बाहेर काढणे आवश्‍यक आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आयुक्तांचे कौतुक... 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांच्या मी सतत संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत असतो. शहरातील उद्योगधंदे सुरू करण्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. देश कोरोनामुक्त करण्यासाठी डॉक्‍टर, पोलिस, नर्स, आरोग्य कर्मचारी व इतर अनेक लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत असून त्यांना आपण सहकार्य करून बळ दिले पाहिजे अशी विनंतीही त्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deputy chief minister ajit pawar visit corona war room at pimpri chinchwad city