राज्यातील आघाडी सरकार म्हणजे पलटूराम : देवेंद्र फडणवीस

पितांबर लोहार
Wednesday, 25 November 2020

'राज्यातील सध्याचे आघाडी सरकार म्हणजे पलटूराम सरकार आहे,'' अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिका केली.

पिंपरी : ''राज्यातील सध्याचे आघाडी सरकार म्हणजे पलटूराम सरकार आहे,'' अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिका केली.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस बोलत होते. महापौर उषा ढोरे, पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा कापरे, महापालिका पक्षनेते नामदेव ढाके, रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.

ह्रदय हेलावून टाकणारी घटना; खेळताना विहीरीत पडून 3 वर्षाच्या अधिराजने गमावला जीव

फडणवीस म्हणाले, ''कोरोनाच्या काळात राज्य सरकारने नागरिकांना वाढीव वीज बिले दिली. त्या विरोधात आम्ही आंदोलन केले. त्यावेळी सरकार म्हणाले, वीज बिल कमी करू. पण, जी वीज आम्ही वापरलीच नाही, त्याचे बिल का भरायचे. आता पुन्हा वाढीव बिले आली आहेत. आणि उर्जा मंत्री म्हणतात, तेव्हा माझा अभ्यास झालेला नव्हता. आता अभ्यास केला आहे. त्यामुळे वीज बिले कमी करता येणार नाहीत. हे सरकार फक्त आश्र्वासने देत आहे. त्यांचे पालन करीत नाही. हे सरकार म्हणजे पलटूराम सरकार आहे.''

राज्य सरकार आता वर्षपूर्ती करेल. या वर्षभरात त्यांनी नवीन कामे कोणतीही केली नाहीत. केवळ चालू कामांना स्थगिती देऊन राज्य स्थगित केले आहे. सरकार फक्त एकच धंदा करीत आहे. तो म्हणजे अधिकाऱ्यांच्या बदल्या करा आणि माल कमवा, अशी टीका करून फडणवीस म्हणाले, ''राज्य सरकार विरुद्ध लोकांच्या मनात असंतोष आहे. तो विधान परिषद निवडणुकीत मतांमध्ये परिवर्तित करा. हे काम सर्व कार्यकर्त्यांना करायचे आहे. मतदारांशी संवाद साधायचा आहे. कारण, राज्य सरकारने जनतेला विज बिलांच्या रकमेचा शाॅक दिला आहे. आपण, त्यांना विधान परिषद निवडणुकीत मतांचा शाॅक द्यायचा आहे.''

बिहार विधानसभा निवडणुकीबाबत फडणवीस म्हणाले, ''बिहार मधील जनतेने भाजपवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आजही मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे. इतकेच नव्हे तर, अनेक राज्यांतील पोट निवडणुकांमध्ये सुद्धा मतदारांनी भाजपला पसंती दिली आहे. कारण, कोरोना काळात मोदी सरकारने गरिबांची मदत केली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेतून अर्थसाहाय्य दिले आहे.''

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सरकारने कोरोना काळात कोणालाही मदत केलेली नाही. तुम्ही तुमच्या घरी रहा, तुमचं कुटुंब सांभाळा. आम्ही आमच्या घरी राहतो, आमचं कुटुंब सांभाळतो, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis criticizes Thackeray government