Sharad Pawar : भंडारा डोंगर मंदिर उभारणीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawarm  Bhandara Dongar temple Sant Tukaram Maharaj Temple

Sharad Pawar : भंडारा डोंगर मंदिर उभारणीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा

पिंपरी : तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सुमारे १२५ कोटी रुपये खर्चाचे उभारण्यात येत असलेले जगद्‍गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिरासंदर्भात श्री विठ्ठल-रखुमाई, तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत भेट घेऊन चर्चा केली. तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद-पाटील, पंकज गावडे, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते. त्यांनी रविवारी (ता. २३) सकाळी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सुमारे १२५ कोटींचे उभारण्यात येत असलेल्या संत तुकाराम महाराज मंदिरासंदर्भात माहिती दिली. मंदिराच्या कामाची पार्श्वभूमी विलास लांडे यांनी सांगितली. बाळासाहेब काशीद यांनी मंदिराचे स्वरूप आणि चालू असलेल्या कामाची माहिती देऊन पवार यांनी मंदिराची माहिती दिली.

त्यामध्ये मंदिराचे अंदाजपत्रक, बांधकाम, बांधकाम शैली, त्याबाबत होत असलेले प्रयत्न याबाबत सविस्तर सांगितले. पंकज महाराज गावडे यांनी मंदिर उभारणीमागील आध्यात्मिक व सामाजिक उद्देश, गरज आणि भविष्यातील मंदिरांचे काम कसे व का गरजेचे आहे, याबाबत पवार यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. पवार यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर अतिशय समाधान व आनंद व्यक्त केला आणि मंदिराच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी सार्थ ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांच्या जीवनावरील पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन पवार यांचा श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली.