'कामगार कवी नारायण सुर्वे यांची कविता चिरंतन' 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

  • नारायण सुर्वे पुरस्कारांचे वितरण 

पिंपरी : "जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे, तोपर्यंत नारायण सुर्वे यांची कविता चिरंतन राहील,'' असा विश्‍वास पिंपरी-चिंचवड येथील 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कामगार कवी नारायण सुर्वे यांच्या नेरळ (ता. कर्जत, जि. रायगड) येथील स्मारकात पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित काव्यजागर संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी सबनीस बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, कृष्णामाई सुर्वे, मसाप भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद भोसरी शाखाध्यक्ष मुकुंद आवटे, लायन्स क्‍लब भोजापूर गोल्डचे अध्यक्ष अरुण इंगळे, दिनेश औटी आदी उपस्थित होते. नारायण सुर्वे लिखित 'ऐसा गा मी ब्रह्म...' कवितेचे राजेंद्र वाघ यांनी केलेल्या गायनाने प्रारंभ झाला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रसंगी नारायण सुर्वे पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विश्‍वास वसेकर (जीवनगौरव), ज्येष्ठ उद्योजक रंगनाथ गोडगे-पाटील (श्रमउद्योग), कष्टकरी नेते काशिनाथ नखाते (श्रमप्रतिष्ठा), नांदेड येथील देविदास फुलारी (कुसुमाग्रज काव्यप्रतिभा), लोणार येथील डॉ. विशाल इंगोले आणि पैठण येथील संदीप जगदाळे (साहित्य) यांचा सन्मान केला. उद्धव कानडे, भरत दौंडकर, प्रा. दिगंबर ढोकले यांच्या निवड समितीने पुरस्कारार्थींची निवड केली होती. 'आम्ही नारायण सुर्वे यांचे वारसदार' कविसंमेलनात ललिता सबनीस, नीलेश म्हसाये, प्रदीप गांधलीकर, सुहास घुमरे, हृदयमानव अशोक, सारिका माकोडे, सुरेश कंक, संगीता झिंजुरके यांनी कविता सादर केल्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. सबनीस म्हणाले, "कवितेच्या माध्यमातून सुर्वेमास्तरांनी मराठी माणसे जोडली. खरी संस्कृती ही श्रमाधिष्ठित असल्याने त्यांचे कवितेचे विद्यापीठ श्रमिकांचे विद्यापीठ झाले आहे.'' पुरुषोत्तम सदाफुले, कल्पना सुर्वे-घारे, गणेश घारे यांनी संयोजन केले. बाजीराव सातपुते यांनी आभार मानले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of Narayan Surve Awards at Neral