पिंपरी : खासगी रुग्णालयांतील नियोजित शस्त्रक्रिया पुन्हा सुरू; डॉक्‍टर घेताहेत अशी काळजी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020

शहरात 100 खाटांपेक्षा जास्त अशी 4 ते 5 खासगी रुग्णालये असून, सुमारे 450 लहान-मोठी रुग्णालये आहेत.

पिंपरी : सुमारे दीड महिन्यांपेक्षा अधिक काळ निरनिराळ्या छोट्या-मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये बंद असलेल्या नियोजित शस्त्रक्रिया सुरु झाल्या आहेत. तसेच खासगी डॉक्‍टरांकडून वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई) संचाचा वापर करत वैद्यकीय उपचार केले जात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     

शहरात 100 खाटांपेक्षा जास्त अशी 4 ते 5 खासगी रुग्णालये असून, सुमारे 450 लहान-मोठी रुग्णालये आहेत. राज्यात टाळेबंदी लागू झाल्यावर शहरातील अनेक लहान-मोठ्या खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या होत्या. त्यामागे, पीपीई कीट उपलब्ध नसणे हे देखील महत्वाचे कारण होते. मात्र, आता या शस्त्रक्रिया चालू झाल्या आहेत. 
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पिंपरी-चिंचवड, भोसरी शाखेने दिलेल्या माहितीनुसार, टाळेबंदी लागू झाल्यावर अनेक रुग्णालयांतील निमवैद्यकीय कर्मचारी त्यांच्या गावी गेले. काही कर्मचाऱ्यांना रुग्णालयांमध्ये ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती. तसेच पोलिसांनी खासगी वाहने वापरण्यासही निर्बंध लादले होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याशिवाय, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे असे रुग्णही त्यासाठी रुग्णालयांत दाखल होत नव्हते. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांना त्यांच्याकडील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या होत्या. मात्र, या शस्त्रक्रिया फार काळ पुढे ढकलणे योग्य नसल्याने आता रुग्णालयांतील डोळे, नाक-कान-घसा, अस्थिरोग आदींवरील नियोजित शस्त्रक्रिया चालू झाल्या आहेत. त्यासाठी आवश्‍यक ती काळजी रुग्णालयांकडून घेतली जात आहे. सॅनिटायझर आणि पीपीई कीटचा वापर केला जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विषाणूजन्य आजारांचे मोठे आव्हान 

दरवर्षी पावसाळ्यात चिकनगुनिया, हिवताप, डेंगी यासारखे आजार उद्‌भवत असतात. यंदाच्या वर्षी त्याबरोबरीने कोरोनाचेही आव्हान डॉक्‍टरांसमोर राहणार आहे. सध्या स्वाईन फ्लू किंवा सारी आजारांचे रुग्ण अत्यल्प आहेत. मात्र, त्यांनाही विचारात घ्यावे लागणार आहे. बहुतेक आजारांमध्ये सर्दी, खोकला, ताप ही सर्वसामान्य लक्षणे आढळतात. त्यामुळे, त्यांचे अचूक निदान करणे हे डॉक्‍टरांसाठी खूप महत्वाचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctors use personal safety equipment during surgery at pimpri