पिंपरी-चिंचवडकरांनो सावध राहा; कुत्र्यांचे हल्ले वाढले, पाच महिन्यांत दोन हजार 430 जणांना चावा

आशा साळवी 
Tuesday, 29 September 2020

शहरात मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांच्या जिवावर उठत आहे.

पिंपरी : लॉकडाउनमुळे बऱ्याच दिवसांनी 'इव्हेनिंग वॉक'साठी बाहेर पडले होते. तेवढ्यात काही अंतरावर सहा भटक्‍या कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला करून जखमी केले. या हल्ल्यात त्यांनी उजवा हात, करंगळी, गुडघा, मांडी आणि पायाला चावा घेतला. जिवाच्या आकांताने आरडाओरड केल्यावर एका परिचिताने मला सोडवले आणि तातडीने जवळच्या हिंजवडी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण ते कोविड रुग्णालय असल्याने मला उपचारासाठी पुण्यात जावे लागले, ही आपबिती सांगताहेत हल्ल्यात जखमी झालेल्या हिंजवडीतील गीतिका बिश्‍त. त्यांच्याप्रमाणेच गेल्या पाच महिन्यात दोन हजार 430 जणांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांच्या जिवावर उठत आहे. सध्या रस्त्यांवरील कुत्र्यांना पकडण्यात येत नाही. तसेच, त्यांची नसबंदीही केली नसल्याने संख्या वाढतच आहे. त्याचाच परिपाक म्हणून रस्त्यांवर व गल्लोगल्ली कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडीच दिसून येताहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बिश्‍त म्हणाल्या, "मी हिंजवडी फेज तीनच्या सॅन्ग्रीया सोसायटीत राहायला आहे. सायंकाळी फिरत असताना सहा कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात माझा हात फ्रॅक्‍चर झाला आहे. पण आता सर्व रुग्णालये कोविड रुग्णालयात रूपांतरित झाले आहेत. त्यामुळे माझे मित्र हिमेश सागर आणि पवन चौबे यांनी मला प्राथमिक उपचारांसाठी हिंजवडी रुग्णालयात नेले. पण ऍन्टिरेबिज लस उपलब्ध नसल्याने आम्हाला औंध रुग्णालयात दाखल केले. पण तेथेही उपचार मिळाले नाही. तेथून ससून रुग्णालयात जाण्यास सांगितले. अगोदरच त्रास होता, त्यात उपचार न मिळाल्याने अधिकच भर पडली. शेवटी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. आतापर्यंतचा 10 इंजेक्‍शन घेतले असून, सुमारे 12 हजार रुपये खर्च आला आहे. मला बसणे, झोपणे, खाणे अवघड झाले आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सागर म्हणाले, "मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खरोखर धोकादायक आहे. कारण हल्ला खरोखर क्रूर होता. त्यांच्या बचावासाठी मी आणि माझी पत्नी आलो, नसतो तर त्यांचा मृत्यू झाला असता.'' 

पाच महिन्यांतील श्‍वानदंश 

महिना.......श्‍वानदंश

- एप्रिल........606 
- मे............584 
- जून..........403 
- जुलै..........393
- ऑगस्ट......444


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dog attacks increased in pimpri chinchwad city