esakal | पिंपरी : रुग्णाचे रिपोर्ट पाहून पॅनिक होऊ नका; डॉक्टरांचे आवाहन

बोलून बातमी शोधा

Doctor
पिंपरी : रुग्णाचे रिपोर्ट पाहून पॅनिक होऊ नका; डॉक्टरांचे आवाहन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना संसर्ग झालेल्या काही रुग्णांच्या सीटी स्कॅन, एचआरसीटी, सीबीसी अशा तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांच्या तोंडी तपासण्या, त्यांचा अहवाल व त्यावर होणारी चर्चा ऐकायला मिळत आहेत. त्या अहवालातील (रिपोर्ट) आकडे पाहून अनेक जण आपापल्यापरीने अर्थ काढत असून, भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉक्टरांशी संवाद साधला. ‘कोणतीही वैद्यकीय तपासणी व त्याचा रिपोर्ट हा आमच्यासाठी गाईडलाइन ठरत असतो. त्यानुसार उपचाराची दिशा ठरवली जाते. त्यामुळे रिपोर्ट पाहून रुग्ण अथवा नातेवाइकांनी पॅनिक होऊ नये, घाबरून जाऊ नये, असे डॉक्टरांनी सांगितले.

लोकमान्य रुग्णालयाचे सहयोगी उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण जोशी म्हणाले, ‘‘आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, उपचार पद्धती ठरली आहे. तपासणी रिपोर्टनुसार उपचार केले जातात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण जास्त असले, तरी बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. मृत्यूदर कमी आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसीकरण करून घ्यावे.’’ वायसीएममधील डॉ. संदीप पाटील म्हणाले, ‘‘रिपोर्ट आमच्यासाठी उपयुक्त ठरतात; पण नागरिक ते पाहून घाबरून जातात. केवळ ऑक्सिजन पातळी कमी होऊ न देणे महत्त्वाचे आहे. नातेवाइकांनी विनाकारण रुग्णालय बदलवत रुग्णाची फिरवाफिरव करू नये.’’

हेही वाचा: रेमडेसिव्हीर इंजेक्शनची समस्या तीन दिवसांत संपेल

अशी काही उदाहरणे...

अँटिजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह, पण आईला जेवण जात नव्हते. स्थानिक डॉक्टरांकडे पुन्हा तपासणी केली. ऑक्सिजन पातळी ९० पर्यंत खाली होती. रुग्णालयात दाखल केले. सीटी स्कॅन केले आणि डॉक्टरांनी सांगितले, ‘संसर्ग आहे. ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्शनची आवश्‍यकता आहे.’ त्यानंतर रेमडेसिव्हिरसाठी शोध सुरू झाला. सीटी स्कॅन रिपोर्टनुसार संसर्गाचा स्कोअर दहा होता व को-रॅड्स चार. सुदैवाने सरकारी रुग्णालयात आईला ऑक्सिजन बेड मिळाला होता व रेमडेसिव्हिरही उपलब्ध झाले. आठ दिवसांत प्रकृती सुधारली आणि आईला डिस्चार्ज मिळाला, असं पस्तीशीतील तरुण सांगत होता. त्याला विचारले, ‘सीटी स्कॅन स्कोअर दहा व को-रॅड्स चार, म्हणजे काय?’ याचे उत्तर त्याला देता आले नाही. पण, ते आकडे पाहूनच आम्ही घाबरलो होतो, असे त्याने नमूद केले. - मोशीतील खासगी रुग्णालयात ४२ वर्षीय रुग्ण आठ दिवसांपूर्वी दाखल झाला. त्यावेळी त्याचे ऑक्सिजन प्रमाण नॉर्मल होते. सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये स्कोअर पाच होता.

डॉक्टरांनी उपचार सुरू केले. आठ दिवस व्यवस्थित गेले. मात्र, दोन दिवसांपूर्वी पुन्हा सीटी स्कॅन केले. त्यात स्कोअर पंधरावर दिसला आणि रुग्ण घाबरला. पत्नी व नातेवाइकांना स्कोअरबाबत मोबाईलद्वारे कळविले. सर्वांनी रुग्णालयात धाव घेतली. त्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आणि दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली व उपचार सुरू केले. ‘रुग्णाची प्रकृती चांगली आहे. त्यांना केवळ ऑक्सिजनची गरज आहे. रेमडेसिव्हीर सुरू केले आहे. रिपोर्टकडे लक्ष देऊ नका, ते आमच्यासाठी गाईडलाइन असतात,’ असे सांगून डॉक्टरांनी नातेवाइकांचे समुपदेशन केले.