esakal | रेमडेसिव्हीर इंजेक्शनची समस्या तीन दिवसांत संपेल

बोलून बातमी शोधा

रेमडेसिव्हीर
रेमडेसिव्हीर इंजेक्शनची समस्या तीन दिवसांत संपेल
sakal_logo
By
पितांबर लोहार

पिंपरी : शहरात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा व कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा भासत आहे. यासाठी सरकार व महापालिका स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. हा प्रश्‍न तीन दिवसांत संपेल, असे महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त विकास ढाकणे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमधील डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी यांची भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितमध्ये बैठक झाली. त्यात ढाकणे बोलत होते.

हेही वाचा: बारामतीत कोराेना रुग्णसंख्येने गाठला आज चारशेचा टप्पा

हॉस्पिटल ओनर असोसिएशनचे सचिव डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. गणेश भोईर उपस्थित होते. शासनाच्या आदेशानंतर आम्ही काम करत आहोत. लवकरच अडचणींवर मात करू, असे सांगून ढाकणे म्हणाले, ''अडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. गॅस पुरविणार्‍यांनी अडचणींमुळे गॅस देणार नसल्याचे सांगितले. त्याबाबत शासकीय पातळीवर बैठका सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढायला लागल्यानंतर काही कंपन्यांकडून लस बनविण्यास सुरुवात केली. हाफकिन कंपनीसोबत चर्चा करत आहे. महापालिकेकडे अडीच हजार रुग्ण असताना दीड हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन येत आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाची देखील कसरत होत आहे.

डॉक्टरांना त्रास देवू नये : लांडगे

सुमारे १५ हजार डॉक्टरांची शहरात नोंदणी केलेली आहे. त्यांना विनंती केली आहे की, आम्ही सेंटर चालू करतो, तुम्ही ते हाताळावे. स्वतःच रुग्णालय सांभाळून डॉक्टरांनी ही कामे केली. मात्र महापालिका अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना महापालिका अधिकारी त्रास देत आहेत. लोकप्रतिनिधी देखील संपर्क करत आहेत. नागरिक लोकप्रतिनिधींवर दबाव टाकत आहेत. नागरिकांना त्रास होतोय, त्या बद्दल लोकप्रतिनिधी या नात्याने माफी मागतो. मात्र या संकटातून नागरिकांना बाहेर काढायचे आहे, हा आपण ठाम निश्‍चय केला पाहिजे.''

जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे पाठपुरावा…

शहरात रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. मात्र, मदत केली नाही की नागरिक नाराज होत आहेत. कोविडचे काम करणारे महापालिका अधिकारी व डॉक्टर यांची बैठक घेऊन यावर योग्य मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी शहरातील तीनही आमदारांकडे मागण्यांचे निवेदन द्या, आम्ही मार्ग काढु. इंजेक्शनबाबत जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्याकडे पाठपुरावा करत आहे, असेही आमदार लांडगे यांनी सांगितले.

हेही वाचा: सदोष खाद्यामुळं कोंबड्यांनी अंडी देणं केलं बंद; व्यावसायिकांना कोट्यवधीचा फटका

''आमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे. आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतो. जीव धोक्यात घालतो. कारकुनी काम वाढवल्यामुळे वेळ वाया जातो. पेशंट तपासण्यासाठी वेळ लागत आहे. अनेकांनी सर्व रुग्णालय बंद करण्याची मनस्थिती केली होती. मात्र आमदार लांडगे यांनी समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.''

- डॉ. प्रमोद कुबडे, सचिव, हॉस्पिटल ओनर असोसिएशन