पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मौनाबाबत शंका 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

  • महापालिका सत्तांतराला चार वर्षे
  • विरोधी पक्षाची ठाम भूमिका दिसलीच नाही 

पिंपरी : महापालिका स्थायी समिती सभा असो अथवा सर्वसाधारण सभा, विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका केवळ 'तोंड देखलेपणा'ची दिसते आहे. चार वर्षांत प्रखर आक्रमकपणा दिसलेला नाही. तसेच, स्थायी समितीत घेतलेले निर्णय व पक्षाची भूमिका याबाबत कोणीही सदस्य बोलत नाही, यामुळे सदस्यांच्या मौनाबाबत शंका उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेत सलग पंधरा वर्षे सत्ता उपभोगलेल्या व "शहराचा कायापालट आम्हीच केल्याचा दावा' करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीत मतदारांनी विरोधात बसविले. भाजपकडे एकहाती सत्ता दिली. या घटनेला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत सत्ताधारी भाजपने केवळ दोन नगरसेवकांना पक्षनेतेपदी संधी दिली. याउलट राष्ट्रवादी कॉंग्रेसने चार जणांना विरोधी पक्षनेतेपदासाठी संधी दिली. यात माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने, नाना काटे व राजू मिसाळ यांचा समावेश आहे. यापैकी साने यांचा आक्रमकपणा कधी-कधी दिसायचा; पण, त्यांच्या निधनामुळे तोही लोपला आहे. 

अनेकांची स्वप्ने भुईसपाट; भोसरी रेडझोनमधील बांधकामांवर मोठी कारवाई

इतरांपैकी कोणीही विरोधक म्हणून ठोस भूमिका घेतलेली नाही. मत पटले नाही, म्हणून सभेचा अजेंडा फाडून सभागृहात भिरकावल्याचे एक-दोन प्रकार घडले. याशिवाय, स्थायी समिती सभागृहातही त्यांचे चार सदस्य आहेत. त्यांचेही नेहमी मौन असते. बोललेच तर, आपल्या प्रभागापुरती भूमिका एखादी सदस्य घेतो. त्याला इतरांची साथ मिळत नाही. सभा संपल्यानंतरही माध्यमांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचत नाही, अशी स्थिती आहे. सध्या कोविड केअर सेंटरचा हिशेब, यंत्राद्वारे रस्ते सफाई, बनावट एफडीआर प्रकरण पक्षाची ठोस भूमिका कुठेच दिसत नाही. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सदस्यांची बैठक घेऊ 
विद्यमान विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, "चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोध करीत असतो. यापुढे स्थायी सभा होण्यापूर्वी त्यातील अजेंडावर पक्षाच्या सदस्यांची बैठक घेऊन चर्चा केली जाईल. सभा झाल्यानंतरची माहितीही दिली जाईल.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doubts about the silence of the nationalist congress party in pimpri chinchwad municipal corporation