
विनामास्क मोटार चालवत असलेल्या चालकाला वाहतूक पोलिसांनी कार बाजूला घेण्यास सांगितले. हे सांगत असताना पोलिसांची वॉकीटॉकी कारमध्ये पडली.
पिंपरी : विनामास्क मोटार चालवत असलेल्या चालकाला वाहतूक पोलिसांनी कार बाजूला घेण्यास सांगितले. हे सांगत असताना पोलिसांची वॉकीटॉकी कारमध्ये पडली असता, चालक कार न थांबवता व वॉकीटॉकी परत न करता तेथून पसार झाला. ही घटना रहाटणीतील शिवार चौकात घडली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय व्यंकटेश कामटे (वय 53) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी बुधवारी (ता. 2) दुपारी अडीचच्या सुमारास शिवार चौकात वाहतूक नियमनासह विनामास्क वाहनचालकांवर देखील कारवाई करीत होते. दरम्यान, मास्क परिधान न केलेला एक वाहनचालक तेथून जात असताना फिर्यादी यांनी चालकाला वॉकीटॉकीच्या एरियलच्या साहाय्याने मोटार बाजूला घेण्याचा इशारा केला.
हे सांगत असताना फिर्यादीकडील 17 हजार 729 रुपये किमतीची वॉकीटॉकी मोटारीत पडली. त्यावेळी मोटार बाजूला न घेता अनोळखी चालक पोलिसांची वॉकीटॉकी घेऊन कारमधून पसार झाला. याबाबत अनोळखी कारचालकावर सरकारी कामात अडथळा आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.
पोलिसांवर दगडफेक
तडीपार आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या आरोपीला पकडून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने दगडफेक केली. तसेच पोलिस विनाकारण त्रास देत असल्याची पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्याची धमकीही दिली. हा प्रकार भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडला.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
निलेश सुनील पवार (वय 24, रा. फातिमानगर, आदर्शनगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई विशाल हनुमंत काळे यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी निलेश पवार हा सराईत गुन्हेगार असून, त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 24 ऑगस्ट 2020 ला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले आहे. तडीपार आदेशाचा भंग करून निलेश शहरात आला. दरम्यान, निलेश शहरात आला असून, तो बालाजीनगर झोपडपट्टी येथे असल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक त्याला पकडण्यासाठी बुधवारी (ता. 2) रात्री साडेनऊच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी येथे गेले. त्यावेळी निलेशने पोलिसांशी झटपटी करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने पोलिसांवर दगडफेक केली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
'तुम्ही मला विनाकारण पकडता. मी तुम्हाला पाहून घेतो. तुमची पोलिस आयुक्तांकडे तक्रार करतो', अशी पोलिसांना धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिसांनी निलेशला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.