'जेलमधून बाहेर आल्यावर मी तुझी गेम करीन', वाहतूक पोलिसालाच दिली धमकी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकी चालकाला अडविल्याचा राग मनात धरून दुचाकीचालकाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत शिवीगाळ केली.

पिंपरी : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकी चालकाला अडविल्याचा राग मनात धरून दुचाकीचालकाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. "मी इथला दादा आहे. तुला काय तक्रार द्यायची ती दे, मी दोन दिवसांत जेलमधून बाहेर येईल, पण बाहेर आल्यावर मी तुझी गेम करून टाकीन,'' अशी धमकीही पोलिसाला दिली. ही घटना कासारवाडीतील नाशिक फाटा येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेश संभाजी चव्हाण (वय 28, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) या दुचाकीचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार विष्णू तुकाराम नागरे यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत असून, रविवारी (ता. 25) सायंकाळी पाचच्या सुमारास ते नाशिक फाटा येथील जेआरडी टाटा उड्डाणपुलाखाली भोसरीकडे जाणाऱ्या मार्गावर कर्तव्यावर होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आरोपी कासारवाडीकडून विरुद्ध दिशेने दुचाकीवरून येत असल्याने फिर्यादीने त्याला थांबवून नाव व पत्ता विचारला. दुचाकी थांबविल्याचा राग आल्याने आरोपी हा फिर्यादीच्या अंगावर धावून गेला. त्यांची कॉलर पकडून "तू कोण मला अडविणारा व विचारणारा. मी इथला दादा आहे, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही. तुला काय तक्रार द्यायची ती दे, मी दोन दिवसांत जेलमधून बाहेर येईल, पण बाहेर आल्यावर मी तुझी गेम करून टाकीन,'' अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: driver's threat to traffic police at nashik phata kasarwadi