esakal | खाद्य तेल महागले; ऐन सणासुदीत गृहिणींचे बजेट कोलमडणार
sakal

बोलून बातमी शोधा

खाद्य तेल महागले; ऐन सणासुदीत गृहिणींचे बजेट कोलमडणार

दिवाळीच्या तोंडावरच तेलाने शंभरी पार केल्याने ऐन सणासुदीत दर कुठपर्यंत जातील, याचा अंदाज बांधता येत नसल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले.

खाद्य तेल महागले; ऐन सणासुदीत गृहिणींचे बजेट कोलमडणार

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी : केंद्र सरकारने तेल आयातकरात वाढ केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून तेलाच्या दरात वाढ होत गेली. त्याचबरोबर चीनकडून सूर्यफुलाच्या तेलाची जास्त खरेदी सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला तेजी आहे. त्यामुळे घाऊक बाजारात सर्वच प्रकारचे तेलाचे भाव 200 रुपयांनी वाढले. परिणामी ऐन सणासुदीत गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडल्याने गृहिणींना तेलाची फोडणी जरा जपूनच टाकावी लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दसरा-दिवाळीत गोड्यातेलाची मागणी अधिक असते. मात्र, यावर्षी वातावरणातील बदल, अर्जेंटिना आणि अमेरिकेत सोयाबीनचे झालेले नुकसान, युक्रेन आणि रशियात सूर्यफुलाचे नुकसान झाल्यामुळे देशात सूर्यफूल रिफाइंड तेलाची टंचाई जाणवू लागली आहे. दिवाळीच्या तोंडावरच तेलाने शंभरी पार केल्याने ऐन सणासुदीत दर कुठपर्यंत जातील, याचा अंदाज बांधता येत नसल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यापासून सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्‍टोबरमध्ये किलोमागे 190 ते 200 रुपयांनी वाढ होत गेल्याने 15 लिटरचा तेलाचा डबा थेट 1800 ते 1900 रुपयांवर गेला आहे. सूर्यफुलाच्या दरात वाढ झाल्याने आपोआपच सरकी तेलावर परिणाम झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात सरकी तेलाचा दर 110 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. येत्या महिनाभर ही स्थिती कायम राहणार असल्याच्या अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

का महागले तेल? 

भारतात सूर्यफूल तेल पूर्णपणे आयात होते. युक्रेन आणि रशियामधून भारताला सूर्यफूल तेलाचा पुरवठा होतो. यावर्षी या देशामधील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून, पाऊसही कमी झाला आहे. परिणामी तेथे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने सूर्यफुलाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. तेल उत्पादन घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्यामुळे भारतात या तेलाची टंचाई जाणवत आहे. याशिवाय चीनने सूर्यफूल तेल खरेदी सुरू केल्याने शहरात सूर्यफूल तेलाचे भाव डब्यामागे 150 ते 200 रुपयांनी वाढले आहेत. अर्जेंटिना, अमेरिका या देशांसह भारतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने सोयाबीन तेलाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. यामुळे सोयाबीन तेलही महागले आहे. याचा एकत्रित परिणाम पाम तेलाच्या किमतीवर होऊ लागला आहे. अशी माहिती व्यापारी मनोहर जेठवानी यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तेलाचे किरकोळ बाजारातील दर (प्रतिकिलो) 

  • सरकी - 110 रुपये 
  • पामतेल - 115 रुपये 
  • सूर्यफूल - 130 रुपये 
  • शेंगतेल - 160 रुपये 
  • सोयाबीन -150 रुपये 

आंतरराष्ट्रीय बाजारात शॉर्टेज असल्यामुळे सूर्यफूल तेलाचे भाव वाढले आहेत. जोपर्यंत परदेशातील स्थिती सुधारत नाही, परिणाम सध्या देशांतर्गत बाजारपेठेत दिसत आहे. दिवाळीनंतरही हीच स्थिती कायम राहील. 

- शामअर्जुन मेंगराजानी, अध्यक्ष, किराणा माल ड्रायफ्रूट संघटना