esakal | पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदाची निवडणूक सहा नोव्हेंबरला
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदाची निवडणूक सहा नोव्हेंबरला

 

गेल्या आठवड्यात तुषार हिंगे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले आहे. सत्ताधारी भाजप उपमहापौरपदी कोणाला संधी देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदाची निवडणूक सहा नोव्हेंबरला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शहराच्या उपमहापौरपदाची निवडणूक सहा नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता होणार आहे. यासाठी होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेच्या पीठासन अधिकारीपदी पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांची निवड विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात तुषार हिंगे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले आहे. सत्ताधारी भाजप उपमहापौरपदी कोणाला संधी देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

 महापालिकेत कधी नव्हे ती संधी मिळाली आणि सत्ताधारी भाजपने अधिकाधिक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदांवर संधी मिळविण्याचे धोरण स्वीकारले. त्यात शहराचे प्रथम नागरिक असलेले महापौरपदाचाही समावेश आहे. त्या जोडीला उपमहापौरपदही. त्यामुळे निश्‍चित कालावधी पूर्ण केल्यानंतर महापौर, उपमहापौरांना राजीनामा द्यावा लागणार, हे ठरलेले आहे. मात्र, मुदत पूर्ण होण्यापूर्वीच तुषार हिंगे यांचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेतला गेला आता नवीन उपमहापौर कोण? याची चर्चा सुरू झाली आहे

दरम्यान, महापौर उषा ढोरे पुढील महिन्यात एक वर्षाचा कालावधी पूर्ण करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलाची चर्चाही सुरू झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महापौरपदी ढोरे व उपमहापौरपदी हिंगे यांची  निवड झाली होती. 

भाजपची सत्ता महापालिकेत आल्यानंतर अर्थात फेब्रुवारी 2019 च्या निवडणुकीनंतर महापौरपदी विराजमान होण्याचा मान नितीन काळजे यांना मिळाला होता. त्या वेळी उपमहापौरपदी शैलेजा मोरे यांची निवड झाली होती. साधारणतः सव्वा महिन्याचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि महापौर, उपमहापौरपदी अनुक्रमे राहुल जाधव आणि सचिन चिंचवडे यांना संधी मिळाली. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे त्यांना साधारणतः तीन महिन्याचा अधिक काळ मिळाला. मात्र, आचारसंहिता संपताच त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. आणि महापौरपदी ढोरे व उपमहापौरपदी हिंगे यांची वर्णी लागली. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाल पुढील महिन्यात अर्थात 22 नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. मात्र, त्यापूर्वीच गेल्या आठवड्यात हिंगे यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

नवीन उपमहापौरांना साधारणतः चौदा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. कारण, महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्यापूर्वी किमान एक महिना अगोदर आचारसंहिता लागू होऊ शकते. म्हणजेच निवडणुकीसाठी अवघे चौदा महिने बाकी आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 विद्यमान महापौर ढोरे यांचा एक वर्षाचा कालावधी पुढील महिन्यात पूर्ण होणार आहे. पक्षाच्या धोरणानुसार त्यांचा राजीनामा घेतल्यास आगामी महापौर, उपमहापौरांना केवळ तेरा-साडेतेरा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. महापालिकेत पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी विकास कामांना गती देणारा व प्रशासनावर पकड मिळवू शकणा-या नगरसेवकांनाच महापौर व उपमहापौरपदी विराजमान करण्याची शक्‍यता आहे.