पिंपरी : महापालिका क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक अर्ज अवैध; तरी, बिनविरोध 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

  • अनुमोदकाच्या पतीचे टोपणनाव वापरल्याने घोळ 

पिंपरी : महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या (प्रभाग समित्या) अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (ता. 9) झाली. विरोधी पक्ष राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने सत्ताधारी भाजपचे उमेदवार बिनविरोध घोषित करण्यात आले. मात्र, 'ह' प्रभागाचे उमेदवार हर्शल ढोरे यांच्या तीनपैकी पहिल्या अर्जावर अनुमोदक नगरसेविकेच्या पतीचे टोपणनाव वापरले होते. त्यामुळे अर्ज अवैध ठरल्याने सर्वांनाचा धक्का बसला. मात्र, त्यांच्या दुसऱ्या अर्जावर बरोबर नाव असल्याने तो वैध ठरला आणि भाजपचा उमेदवार तरला. ढोरे यांच्यासह समर्थकांचा जीव भांड्यात पडला. पण, अर्ज लिहिताना टोपणनाव लिहिणारा 'तो रावसाहेब कोण?' याचीच चर्चा अधिक रंगली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या 'अ', 'ब', 'क', 'ड', 'इ', 'फ', 'ग' आणि 'ह' या आठ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी झाली. त्यासाठी इच्छुक नगरसेवकांनी आपापल्या प्रभाग अधिकाऱ्यांकडे सोमवारी (ता. 5) अर्ज दाखल केले होते. मात्र, विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेनेही उमेदवार न दिल्याने सत्ताधारी भाजपचे आठही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले होते. त्याची निवडणूक प्रक्रिया आज अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झाली. त्यांच्याकडे प्रभाग अधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय अर्ज सादर केले. सभा शाखा सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. यात प्रभाग अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख, दिलीप आढारी, कैलास गावडे, अवधूत तावडे, वामन नेमाणे, श्रीनिवास दांगट आणि श्रीकांत कोळप यांचा समावेश होता. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पीठासन अधिकारी देशभ्रतार यांनी प्रभागनिहाय अर्जांची छाननी केली. अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह प्रभाग अशा क्रमानुसार निवड प्रक्रिया झाली. अ ते ग प्रभागांसाठी सर्वच उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज सादर केले होते. त्यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, ह प्रभागासाठी हर्षल ढोरे यांचे तीन अर्ज होते. त्यांचा पहिलाच अर्ज अवैध ठरला होता. त्यामुळे अन्य दोन अर्जांवरही तीच चूक आहे की काय? अशी शंका उपस्थित करण्यात आली. परंतु, त्यांच्या दुसऱ्याच अर्जावर अचूक माहिती असल्याने तो वैध ठरला आणि त्यांचीही बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. दरम्यान, सर्व नवनिर्वाचित अध्यक्षांचे महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी अभिनंदन केले. त्यानंतर शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या महापालिका आवारातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नेहमी होणाऱ्या जल्लोषाला सर्वांनी आवर घातला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे आहेत प्रभाग अध्यक्ष 
नवनिर्वाचित प्रभाग अध्यक्षांमध्ये 'अ' शर्मिला बाबर, 'ब' सुरेश भोईर, 'क' राजेंद्र लांडगे, 'ड' सागर आंघोळकर, 'इ' विकास डोळस, 'फ' कुंदन गायकवाड, 'ग' बाबासाहेब त्रिभुवन आणि 'ह' हर्षल ढोरे यांचा समावेश आहे. 'अ' प्रभागाच्या विद्यमान अध्यक्षा बाबर यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली. तर, 'ग' क्षेत्रीय कार्यालयाचे 2018 मध्ये अध्यक्षपद भूषविलेले त्रिभुवन यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांनाही पुन्हा संधी मिळाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election process for chairmanship of eight regional offices of pimpri chinchwad municipal corporation took place on Friday.