Video : पिंपरी-चिंचवडकरांनो दातांच्या समस्यांसाठी दंतचिकित्सकांकडे जाणार असाल, तर ही बातमी वाचा

सागर शिंगटे 
शनिवार, 27 जून 2020

- कॉस्मेटिक ट्रिटमेंट पुढे ढकलल्या, पुरेशी दक्षता घेऊन उपचार 

पिंपरी : शहर परिसरातील बहुतेक डेंटल क्‍लिनिक चालू झाले आहेत. मात्र, दंतचिकित्सकांकडून सध्या केवळ तातडीच्या उपचारांनाच प्राधान्य दिले जात आहे. कॉस्मेटिक उपचार पुढे ढकलण्यात आले आहेत. डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया आणि इंडियन डेंटल असोसिएशनच्या मार्गदर्शक तत्वांचा उपचार करताना अवलंबही केला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सुमारे 250 डेंटल क्‍लिनिक आहेत. टाळेबंदी लागू झाल्यापासून त्यातील सुमारे 95 टक्के दंतचिकित्सकांनी स्वतःचे क्‍लिनिक बंद ठेवली आहेत. मात्र, आता टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर हळूहळू डेंटल क्‍लिनिक सुरु होऊ लागले आहेत. परंतु, त्यांच्या दैनंदिन कामात बदल झाले आहेत. सध्या दंतचिकित्सक केवळ तातडीचे उपचार करण्यास प्राधान्य देत आहेत. 

इंडियन डेंटल असोसिएशनच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे सचिव डॉ. संदीप भिरुड म्हणाले, "आमच्या असोसिएशनने आणि डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दंतचिकित्सकांसाठी काही मार्गदर्शक तत्वे निश्‍चित केली आहेत. त्यानुसार डॉक्‍टर आणि त्यांच्या सहाय्यकांसाठी फेसशिल्ड, पीपीई कीटचा वापर, उपचार सुरु करण्यापूर्वी रुग्णांचे तापमान घेणे, त्याची रक्तातील ऑक्‍सिजन पातळी तपासून घेणे, रुग्ण तपासून झाल्यावर खुर्ची आणि क्‍लिनिक सोडियम हायपोक्‍लोराईडने स्वच्छ करणे, हवेच्या शुद्धीकरणासाठी एपा-अल्ट्रा व्हायलेट एअर प्युरिफायर, लावणे, सर्व उपचार साधनांचे निर्जुंतूकीकरण करणे यासारख्या बाबींची अंमलबजावणी केली जात आहे. याशिवाय, अपॉईंटमेंट घेऊनच रुग्णावर उपचार करणे, एकाचवेळी कमाल 2 रुग्ण तपासणे यावरही भर दिला जात आहे.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाकड येथील दंतचिकित्सक डॉ. अभिजीत देशपांडे म्हणाले, "टाळेबंदीत केवळ मोजकी डेंटल क्‍लिनिक चालू होती. मात्र, आता थोडी क्‍लिनिक चालू होऊ लागली आहे. माझे तीन दवाखाने असून सर्व चालू झाले आहेत. रुग्णांच्या बेसिक ट्रिटमेंट चालू आहेत. दुखणारा दात काढून टाकण्याचे उपचार केले जात आहेत. परंतु, बहुतांश क्‍लिनिक अजून बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. दंतचिकित्सा क्षेत्रात कोरोनाच्या प्रादुर्भावावरुन सतत विचारमंथन चालू आहे. त्याच्या संभाव्य प्रसाराबद्दल डॉक्‍टरांना अवगत केले जात आहे. परंतु, विविध प्रकारच्या मतांतरामुळे डॉक्‍टरांत काहीवेळेस संभ्रमही निर्माण होत आहे. अर्थात, तो लगेच दूरही केला जात आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कॉस्मेटिक ट्रिटमेंट पुढे ढकलल्या...

वेडेवाकडे दात नीट करणे, समोरच्या बाजूच्या किडलेल्या परंतु न दुखणाऱ्या दातांवर कम्पोसिट फिलिंग करणे किंवा सिरॅमिक लॅमिनेट करणे, पिवळ्या दातांसाठी टूथ ब्लिचिंग किंवा व्हाइटनिंग, खाताना त्रास होत नसेल तर दात नसलेल्या ठिकाणी दात बसविणे, दातांना सरळ करण्यासाठी तारा लावणे आदी कॉस्मेटिक ट्रिटमेंट पुढे ढकलण्यात येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: emergency treatment is currently preferred by dentists in pimpri chinchwad