आयटी कंपन्यांच्या 'या' नव्या फंड्यामुळे 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

  • आयटी कंपन्यांनी आता हा नवा फंडा सुरू केलाय

पिंपरी : आयटीयन्सना अचानकपणे कामावरून कमी केल्यानंतर अनेक जण त्याबाबत दाद मागण्यासाठी थेट कामगार आयुक्‍तालय गाठतात. त्यानंतर कर्मचारी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये कामगार आयुक्‍तांकडे सुनावणी, निर्णय कर्मचाऱ्यांच्या विरोधात लागला, की पुन्हा कामगार न्यायालयात दावा दाखल होणार, यातून मार्ग काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची नोकरी शाबूत ठेवायची. मात्र, त्यांना काम आणि पगार द्यायचा नाही, असा फंडा काही आयटी कंपन्यांनी सुरू केल्यामुळे आयटीयन्सना नव्या चिंतेनं ग्रासलं आहे. आयटी कंपन्यांकडून सुरू केलेल्या या नव्या प्रकाराचा आतापर्यंत सुमारे दीड हजार जणांना फटका बसला असून, त्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्याचं समोर आलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

वस्तुस्थिती काय ?

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यानंतर आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली. काही जणांनी आपल्याकडं प्रोजेक्‍ट नसल्याचे कारण सांगत कर्मचाऱ्यांना सक्‍तीने रजेवर जाण्याचा सल्ला दिला, तर काहींनी अचानकपणे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. दरम्यान, हे प्रकार वाढू लागल्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांनी संघटनांच्या माध्यमातून कामगार आयुक्‍तांकडे दाद मागितली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं, तर कायदेशीर त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आता काही जणांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याऐवजी 'नो वर्क, नो पे' असे सूत्र राबवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नोकरी जरी हातात असली, तरी काम नाही आणि पगारही नाही, अशा अवस्थेत जगायचे कसे, असा सवाल आयटीयन्सना पडला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'काम नाही आणि पगार नाही', अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या आयटीयन्सनी नवीन नोकरी शोधण्यास सुरुवात केली आहे. नवी नोकरी मिळाल्यानंतर त्याठिकाणी जुन्या कंपनीमधील अुनभव आणि रिलीव्हींग लेटर द्यावे लागते. त्यामुळे सध्या आपल्याला होत असणाऱ्या त्रासाची दाद कंपनीच्या व्यवस्थापनाकडे कशी मागायची, असा सवाल त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सध्या कोरोनाच्या वातावरणामुळे नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध नसल्याने त्यांना आहे, त्याठिकाणी अडकून पडावे लागत आहे. दरम्यान, अशा प्रकारांमुळे आयटीयन्सचे नोकरीच्या ठिकाणी काम आणि पगार या दोन्ही गोष्टी बंद असल्यामुळे दैनंदिन गरजा, कर्जाचे हप्ते, आजारपणाचा खर्च असे प्रश्‍न कसे सोडवायचे, अशी चिंता सतावत असल्याची खंत अनेक आयटी अभियंत्यांनी व्यक्‍त केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयटी कर्मचाऱ्यांना पगार आणि काम न देण्याचे सूत्र काही आयटी कंपन्या राबवत आहेत. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. यामुळे कर्मचारी भविष्यात आपणहून नोकरी सोडून जातील, अशी अपेक्षा त्यांना आहे. कंपन्यांकडून राबवण्यात येत असणारी ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. यासंदर्भात आमच्याकडे तक्रारी आल्या असून, त्यावर मार्ग काढण्यासाठी कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे दाद मागणार असल्याचे नॅशनल इन्फरमेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेटचे सरचिटणीस हरप्रित सलुजा यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: employees worried about new strategy of IT companies