पिंपरीत अतिक्रमणविरोधी विभागाचेच अतिक्रमण 

आशा साळवी
Monday, 26 October 2020

  • लिलाव केलेले भंगार साहित्य अद्याप पडूनच; परिसर बकाल 

पिंपरी : नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमशेजारील जॉगिंग ट्रॅकवर अनेक वर्षांपासून महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागानेच अतिक्रमण केले आहे. कारवाईत जप्त केलेल्या भंगार साहित्याचा दहा वर्षांपूर्वी लिलाव केला आहे. तरी अद्याप साहित्य पडूनच आहे. परिणामी या परिसराला बकाल स्वरूप आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने लाखो रुपये खर्च करून ट्रॅक उभारला आहे. लॉकडाउनपूर्वी परिसरातील नागरिक "मॉर्निंग वॉक'साठी यायचे. सायंकाळी फेरफटका मारायचे. आता ट्रॅकवर अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत जप्त केलेले साहित्य आणून टाकले जात आहे. इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा, स्टूल, प्लॅस्टिक ट्रेचा ढीग लागला आहे. हातगाड्या, लोखंडी खोके अस्ताव्यस्त फेकल्याने बकाल स्वरूप आले आहे. येथून जवळच जलतरण तलाव आहे. शेजारीच महापालिकेने जम्बो रुग्णालय उभारले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते. भंगार साहित्य कुजले आहे. अडगळीमुळे साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले. शेजारीच महापालिकेच्या भांडार विभागाचे गोदाम आहे. परंतु, जागेअभावी जॉंगिग ट्रॅकवरच्या आवारात साहित्य फेकण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जप्त केलेले साहित्य इतरत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"गेल्या वर्षापासून जप्त केलेले साहित्य इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी करत आहे. परंतु प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. दिवसेंदिवस भंगारांची वाढ होत आहे. मात्र, कारवाई काहीच होत नाही.'' 
- चंद्रकांत कणसे, स्थानिक नागरिक 
 
"मगर स्टेडियमच्या आवारातील भंगाराचा भांडार विभागाकडून लिलाव करण्यात आला होता. संबंधितांनी ते साहित्य हटवायला पाहिजे. जप्त साहित्याबाबतही लवकरच योग्य निर्णय घेऊ.'' 
- राजेंद्र राणे, कार्यकारी अभियंता अतिक्रमण विरोधी विभाग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: encroachment of anti-encroachment section in neharunagar Pimpri