भोसरी : इंद्रायणीनगरातील चौकात विक्रेत्यांचे अतिक्रमण, वाहतूक कोंडीची समस्या  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावरच लावतात वाहने; वाहतूक कोंडीची समस्या 

भोसरी : "इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौकातून पुढे जाताना रस्त्यावर बसलेल्या विविध विक्रेत्यांमुळे वाहने चालविताना अडचण येते,'' अशी कैफियत वाहनचालक सुभाष भोसले मांडत होते. "महापालिकेने इंद्रायणीनगरातील भाजी मंडईचे गाळेवाटप केल्यास भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ येणार नाही. त्याचप्रमाणे विक्रेत्यांना अतिक्रमण विभागाच्या कारवाईची भीतीही राहणार नाही,'' असे मत भाजीविक्रेते सुधाकर महाजन यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौक, मिनी मार्केट चौक, साई चौक, इंद्रायणी चौक, द्वारका प्लॅटिनमसमोरील चौक आदी चौकांमधील रस्ते आणि पदपथ भाजी, फळे, खाद्यपदार्थ यासह इतर वस्तू विक्रेत्यांनी व्यापले आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. संध्याकाळी या चौकांमध्ये वाहनांची नेहमीच गर्दी असते. इंद्रायणीनगर चौकात दुकानांसमोर दुचाकींच्या दोन-तीन रांगा लागत आहेत. त्यामुळे इतर वाहनांना ये-जा करण्यासाठी रस्ता अपुरा पडतो. त्यामुळे या चौकात सकाळी आणि संध्याकाळी नेहमीच वाहनांची कोंडी झालेली असते. या भागातील रस्त्यांची रुंदी वाढवूनही रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या वाहनांमुळे पुन्हा "जैसे थे' परिस्थिती निर्माण झाली आहे. इंद्रायणीनगरातील रस्ते आणि पदपथ व्यापणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या विषयी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. 

भाजी मंडई शोभेची वास्तू? 
महापालिकेने मिनी मार्केटजवळ बांधलेली भाजी मंडईतील गाळेवाटप गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. तीन वर्षांपासून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली ही भाजी मंडई आता शोभेची वास्तू झाली आहे. गाळ्यांचे वाटप झाल्यास इंद्रायणीनगरातील चौकाचौकात होणारे फळे-भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणापासून नागरिकांची सुटका होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रस्त्यावर बसणारे काही फळ-भाजी विक्रेत्यांसह विविध वस्तू विक्रेतेही मास्क लावत नाहीत. त्याचप्रमाणे खरेदीसाठी येणारे ग्राहकही रस्त्यावरच वाहने लावतात. त्यामुळे इतर वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर अनधिकृतपणे बसणाऱ्या विक्रेत्यांवर आळा बसणे गरजेचे आहे. 
- संजय उदावंत, स्थानिक रहिवासी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment of vendors in Indrayani Nagar Chowk Bhosari