esakal | ‘अभियांत्रिकीचा निकाल लवकर लावा’ I Engineering
sakal

बोलून बातमी शोधा

Result

‘अभियांत्रिकीचा निकाल लवकर लावा’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - अभियांत्रिकीचा निकाल तत्काळ लावण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आदेश तंत्र शिक्षण उपसंचालक संदीप तडस यांनी मंगळवारी (ता. २८) कुलसचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांना दिले आहेत. याबाबत नुकतेच ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांच्याकडून अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची हिवाळी २०२० परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आली होती. परीक्षा संपून तब्बल ७५ दिवस उलटून गेले तरीही विद्यापीठातर्फे या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. विद्यापीठ कायद्यान्वये परीक्षेनंतर ४५ दिवसात निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली असल्याने प्रत्यक्षात उत्तरपत्रिका तपासणी, साक्षांकित प्रती वितरित करणे, किंवा उत्तर पत्रिकांचे पूर्वावलोकन करण्याचे काम विद्यापीठाला करावे लागत नव्हते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करूनही तंत्रशास्त्र विद्यापीठाचे निकाल अडीच महिन्यातही जाहीर करू शकत नसेल तर राज्यातील इतर विद्यापीठाबाबत आणखीच संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड : ८० शिक्षकांचे वेतन थांबविल्याप्रकरणी समिती स्थापन

शिवाय निकाल लागण्यास विलंब होत असताना या बाबतीत विद्यापीठ आपल्या संकेतस्थळावर एखादी सूचना प्रसारित करून विद्यार्थ्यांना विश्‍वासात घेण्याचाही प्रयत्न करताना दिसत नाही, हे विशेष. विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म वेळेवर न भरल्यास त्यांना दंड आकारला जातो. मग परीक्षेचे निकाल वेळेवर लागत नसतील तर तसाच दंड विद्यापीठाकडून वसूल करून तो विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्याकडे केली होती. याप्रकरणी अभियांत्रिकीचा निकाल तत्काळ लावण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आदेश तंत्र शिक्षण उपसंचालक संदीप तडस यांनी कुलसचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांना दिले आहेत.

loading image
go to top