esakal | औद्योगिक परिसरात होणाऱ्या वीज समस्येने उद्योजक झाले बेजार

बोलून बातमी शोधा

Electricity
औद्योगिक परिसरात होणाऱ्या वीज समस्येने उद्योजक झाले बेजार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिका औद्योगिक परिसरातील भोसरी, चिंचवड, सेक्टर सात व दहा, चिखली, कुदळवाडी, शांतिनगर या भागात विजेच्या समस्येमुळे उद्योजक हैराण झाले आहेत. कंपन्यांच्या महावितरण सोबत विविध समस्यांवर बैठका व वारंवार पत्रव्यवहार झालेला आहे. परंतु, वर्षानुवर्षे वीज समस्यांमुळे उद्योजक त्रासले आहेत, याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होऊन उद्योजक मेटाकुटीला आले आहेत.

एमआयडीसी परिसरात झाडांच्या फांद्या फिडरला अडथळा ठरत आहेत. त्याचप्रमाणे फिडरमधून आवाज येत आहे. गंज चढलेला आहे. फिडरमधून वीज वाहणाऱ्या तारांचे झोल वाढले आहेत. ते धोकादायक ठरत आहेत. फिडर पिलरमधील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या न छाटल्यास जिवाला धोका पोहचू शकतो. तसेच फिडरमधील खराब झालेले पार्टस व दरवाजे कित्येक वर्षांपासून बदलण्यात आलेले नाहीत.

हेही वाचा: ‘ऑटो क्लस्टर’मध्ये वायसीएम पाठवणार रुग्ण; आयुक्तांचा आदेश

एमआयडीसी परिसरात वीज पुरवठ्यासाठी लागणाऱ्या केबलचा पुरवठाही अपुरा असल्याने केबलसाठी ताटकळावे लागत आहे. तसेच नादुरुस्त केबल जागेवरच पडून राहतात. वेळेवर त्या दुरुस्त करून उपलब्ध केल्या जात नाहीत. फिडरची लांबी कमी करणे, अपुरे स्विचिंग स्टेशन, ओव्हरलोडेड ट्रान्सफॉर्मरचा लोड कमी करणे, ऑईलची पातळी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी महिन्याच्या प्रत्येक गुरवारी मेन्टेंनन्सची कामे मार्गी लावण्याची गरज आहे. महावितरणणे थकीत वीज बिलांचे हप्ते देखील एमआयडीसीला सुलभ करून देणे आवश्यक आहेत. अशा विविध प्रकारच्या कठीण समस्यांचा सामना कंपन्या करीत असल्याचे लघु उद्योजकांनी सांगितले.

कंपन्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप केले आहेत. महावितरणचे अधिकारी त्या ग्रुपवर आहेत. पावसाळ्यात फार कठीण समस्यांचा सामना करावा लागतो. खंडित वीजपुरवठ्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. एमआयडीसी आणि महापालिकेने कंपन्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. दर महिन्याला याबाबत आवश्यक त्या बैठका होणे गरजेचे आहे. विभागीय संचालक, महावितरण यांनाही याबाबत पत्र दिले आहे.

- संदीप बेलसरे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना, अध्यक्ष

कोरोना काळात आता सर्व उद्योजकांची मानसिकता बदलली आहे. कच्चा मालासह ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पावसाळ्यात वीज समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. काही परिसरात सलग वीज बंद राहते. यासाठी वीज वाहिन्या भूमिगत होणे गरजेचे आहे.

- नवनाथ वायाळ, उद्योजक, चिखली