esakal | ‘ऑटो क्लस्टर’मध्ये वायसीएम पाठवणार रुग्ण; आयुक्तांचा आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Patil

‘ऑटो क्लस्टर’मध्ये वायसीएम पाठवणार रुग्ण; आयुक्तांचा आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने ऑटो क्लस्टर येथे जम्बो रुग्णालय उभारले आहे. ते स्पर्श संस्थेला चालवण्यास दिले आहे. तिथे उपचाराची सुविधा मोफत आहे. असे असतानाही, बेड उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांकडून एक लाख घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्याची दखल घेत, रुग्ण भरती करून घेण्यास महापालिका आयुक्तांनी मनाई केली आहे. वायसीएम रुग्णालयातर्फे संदर्भित रुग्णच आता ऑटो क्लस्टर रुग्णालयात दाखल केले जाणार आहेत.

महापालिकेने ऑटो क्लस्टरमध्ये दोनशे बेडची व्यवस्था केलेली आहे. निविदा प्रक्रिया करून ते रुग्णालय खासगी संस्थेस चालवायला दिले आहे. मात्र, दोन नगरसेवकांनी केलेल्या आरोपानुसार, या रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यासाठी एका रुग्णाच्या नातेवाइकांकडून एक लाख रुपये डॉक्टरांनी घेतले आहेत. याबाबत महापालिका सर्वसाधारण सभेतही सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुद्दा उपस्थित केला व ऑटो क्लस्टर रुग्णालयात वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या स्पर्श संस्थेच्या व्यवस्थापनावर व दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याचा आदेश महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिला आहे. त्यांना चौकशी करून कारवाई करण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे.

हेही वाचा: पिंपरी : मुलांचे अपहरण करून अश्लील कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा

वायसीएम पाठवणार रुग्ण

शहर व शहराबाहेरील रुग्णांना ऑटो क्लस्टर रुग्णालयात थेट दाखल न करता वायसीएम रुग्णालयाने संदर्भित केलेल्या रुग्णांना दाखल करून घ्यावे, असे पत्र महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पर्श हॉस्पिटलला दिले आहे. वायसीएम रुग्णालयातून रुग्ण संदर्भित करण्याची जबाबदारी प्रा. डॉ. हर्षल पांडवे यांच्याकडे दिली आहे. त्यांना समन्वयक म्हणून डॉ. राहुल गायकवाड व डॉ. गौरव वडगावकर यांची नियुक्ती केली आहे. त्‍यांच्या मार्फत ऑटो क्लस्टरमधील बेड मॅनेजमेंटवर नजर ठेवली जाणार आहे.

पोलिस आयुक्तांना साकडे

महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेने ऑटो क्लस्टर येथे उभारलेल्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी फॉर्च्यून स्पर्श हेल्थकेअर संस्थेची नेमणूक केली आहे. मात्र, एका रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी येथील डॉक्टरांनी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने एक लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या प्रकरणाची आपल्यातर्फे सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करावी.

loading image