पिंपरी-चिंचवड : होळीनिमित्त कोकणासाठी एसटीच्या जादा बसगाड्या 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 February 2021

एसटी महामंडळाने 26 मार्चपासून जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. 29 मार्चपर्यंत एसटी प्रशासनाने होळीनिमित्त जास्तीच्या बसची सोय केली आहे.

पिंपरी : होळीचा सण साजरा करण्यासाठी शहरातील कोकणवासीय गावी जातात. त्यांच्या सोयीसाठी एसटीच्या पुणे विभागाने नियमित बसव्यतिरिक्त जादा बसगाड्यांची सोय केली असून, या बस वल्लभनगर आगारातून सुटतील, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. सर्व बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

होळी सण दीड महिन्यांवर आला असून, 28 मार्चला होळी आणि दुसऱ्या दिवशी धूलिवंदन आहे. कोकणवासीयांना गणेशोत्सवाप्रमाणेच होळीच्या सणाची प्रचंड उत्सुकता असते. या सणानिमित्त शहरातील चाकरमानी कोकणात धाव घेतात. दरवर्षी मेल, एक्‍स्प्रेस गाड्या फूल असतात. यावर्षी रेल्वे बंद असल्यामुळे कोकणवासीयांचे हाल होण्याची शक्‍यता आहे. ही गोष्ट गृहीत धरून एसटी महामंडळाने 26 मार्चपासून जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. 29 मार्चपर्यंत एसटी प्रशासनाने होळीनिमित्त जास्तीच्या बसची सोय केली आहे. वल्लभनगर आगारातून चिपळूण, दापोली, खेड, महाड आदी ठिकाणी जाण्यासाठी बस सुटणार आहेत. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावी जाण्याबरोबर परतीच्या प्रवासासाठीही एसटीची सोय उपलब्ध आहे. शहर परिसर आणि उपनगरात राहणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना दरवर्षीप्रमाणे थेट दारापर्यंत नेण्यासाठी एसटी सज्ज झाली आहे. या व्यतिरिक्त 100 टक्के ग्रुप बुकिंगच्या बस, प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांच्या इच्छित स्थळापासून देण्यात येत आहेत. आरक्षणाच्या बस या नियोजित बसस्थानकातून सुटतील. या सर्व बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती वल्लभनगर आगारप्रमुख स्वाती बांद्रे यांनी दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: extra st buses for konkan on the occasion of holi from pimpri chinchwad