लॉकडाउनमुळे 'या' कलाकारांचे मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

पुणे जिल्ह्यातील भारूड कलाकारांना लॉकडाउनचा फटका बसला आहे.

मोशी : भूत जबर मोठे गं बाई ।
झाली झडपड करूं गत काई ॥ १ ॥

झाली झडपड करूं गत काई ।
सूप चाटूचे केले देवऋषी ॥
या भूताने धरिली केशी ॥ २ ॥

लिंबू नारळ कोंबडा उतारा ।
त्या भूताने धरिला थारा ॥ ३ ॥
भूत लागले नारदाला ।

साठ पोरे झाली त्याला ॥ ४ ॥
भूत लागले ध्रुव बाळाला ।

उभा अरण्यात ठेला ॥ ५ ॥
एका जनार्दनी भूत ।
सर्वांठायी सदोदित ॥ ६ ॥

...ही कर्णमधूर पदे आहेत नाट्यरुपी भजनी भारुड या लोककला प्रकारातील. ग्रामीण भाग आणि लोककलांचे एक आपुलकीचे नातं आहे. ग्रामीण भागामधील काही समज-गैरसमज दूर करण्याचे काम, समाज प्रबोधन आणि सामाजिक शिकवण देण्याचे काम या नाट्यरुपी भारूडच्या माध्यमातून अनेक कलाकार आजही ग्रामीण भागात भजनी भारूड मंडळांच्या मदतीने करतात. ऑक्टोबर ते मेपर्यंत राज्यातील सर्व गावांच्या यात्रा व उरूस सुरू असतात. या यात्रांमध्ये गावकऱ्यांचे मनोरंजन आणि त्यातूनच होणारे समाज प्रबोधन करण्यासाठी गावोगावी आग्रह धरला जातो. तो म्हणजे नाट्यरुपी भजनी भारूड या कार्यक्रमाचा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या नाट्यरुपी कार्यक्रमामधील सर्व पात्रे पुरुष करतात. अगदी स्त्री पात्र सुद्धा. हार्मोनिअम, ढोलकी, पखवाज, तबला, खंजिरी, टाळ आदी पारंपरिक संगीत वाद्यांचा त्यात उपयोग करतात. यामधील भजनेही स्वतःच अभिनय करीत कलाकार म्हणत असतात. एकदा का हे नाट्यरुपी भजनी भारूड रंगात आले, की पहाट कधी होते हे समजत नाही.  मात्र, लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व यात्रा बंद असून, याचा फटका ग्रामीण भागातील धार्मिक कार्यक्रमांनाही बसलेला आहे. पुणे जिल्ह्यातील भारूड कलाकारांनाच या लॉकडाउनचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे अखिल पुणे जिल्हा नाट्यरूपी भजनी भारूड कलाकार संघाचे संस्थापक परशुराम वाकचौरे गुरुजी आपली व्यथा सांगत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ते म्हणाले, "सहा महिन्याच्या काळामध्ये होणार्‍या या यात्रा, उरूसमधून आम्हा कलाकारांना बर्‍यापैकी पैसे मिळतात. या कार्यक्रमांच्या इतर वेळी आम्ही कलाकार शेती, मोलमजुरी तसेच भाजीपाला विक्रीसारखी मिळेल ती कामे करत असतो. सध्या मात्र, कोरोनामुळे हे सर्व भारुडाचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. आता घराच्या बाहेरही पडता येत नाही. त्यामुळे हाताला कोणतेही काम नसल्याने आम्हा कलाकारांची उपासमार होत आहे. 

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक

पुणे जिल्ह्यामध्ये जादातर ग्रामीण भागामधून एकूण ५० ते ५५ भारूड मंडळे आहेत. प्रत्येक मंडळात २० ते ३० कलाकार काम करत असतात. प्रत्येक मंडळ वर्षभरामध्ये सरासरी ३० ते ३५ कार्यक्रम करत असतात. एका भारुडाचे बिदागी १५ ते २० हजार रुपये मिळते. मात्र, प्रवास खर्च जाता तीही तूटपूंजीच ठरते. मात्र, या नाट्यरुपी भारुडामधून समाज जागृतीपर विषय घेऊन समाज प्रबोधन करता येते ही आम्हा कलाकारांसाठी समाधानाची बाब आहे."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आम्हा भारूड कलाकारांना सरकारकडून भरघोस आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा अखिल पुणे जिल्हा नाट्यरुपी भजनी भारुड कलाकार संघाचे संस्थापक परशुराम वाकचौरे गुरुजी, कोषाध्यक्ष लक्ष्मण दुडे, कार्याध्यक्ष नबाजी देवाकडे, सदस्य बाळासाहेब वनवे, नामदेव साठे, तुकाराम गाडे, तुकाराम पोखरकर,  भिमाजीबुवा कुडेकर, किसन नवले, शिवाजी पवळे आदींसह सर्व भारुड मंडळांनी व्यक्त केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने, तर आता लॉकडाउनमुळे वर्षभरातील मिळालेले सर्व भारुडाचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे आम्हा भारूड कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे." 
- मधू महाराज गराडे, अध्यक्ष : लक्ष्मीनारायण भजनी भारूड मंडळ, बोरवाडी (मावळ) 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"भारूड कलाकार आज मोठ्या प्रापंचिक अडचणीत आहेत. एका व्यक्तीवर चार ते पाच माणसांचे कुटुंब अवलंबून असल्याने आणि दुसरा कोणताही अर्थार्जनाचा मार्ग नाही. त्यामुळे उपासमार होत आहे."
- किसन महाराज खुटवड, अध्यक्ष : जननीदेवी भजनी भारूड मंडळ, गोळेवाडी (भोर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facing financial questions before Bharud artists in pune district