Anant Chaturdashi 2020 : पिंपरी-चिंचवड शहरात मिरवणुकीशिवाय बाप्पाला निरोप

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

नागरिक व लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे आठही क्षेत्रीय कार्यालये स्तरावर मूर्ती संकलनासाठी फिरत्या वाहनांची व्यवस्था केली.

पिंपरी : ना मिरवणूक, ना झांज पथक. ना स्वागत, ना सत्कार. ना ढोल ताशांचा दणदणाट, ना डीजेचा आवाज. फक्त गणपती बाप्पा मोरया, म्हणत जाणारे भाविक, महापालिका व स्वयंसेवी संस्थांतर्फे फिरते व नदी घाटांवर मूर्ती विसर्जन टाक्या आणि मूर्ती संकलन वाहन, अशा वातावरणात आज शहरातील भाविकांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाची साखळी खंडित व्हावी, प्रादूर्भाव कमी व्हावा, यासाठी या वर्षी गणेश मूर्ती विसर्जन नदी घाटांवर करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. मात्र, नागरिक व लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे आठही क्षेत्रीय कार्यालये स्तरावर मूर्ती संकलनासाठी फिरत्या वाहनांची व्यवस्था केली. तसेच, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुद्धा मूर्ती संकलन करण्यात आले. निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातून इंद्रायणी, पवना व मुळा नद्या वाहतात. इंद्रायणी नदीवर तळवडे, चिखली, मोशी व च-होली येथे, पवना नदीवर रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवड पूल, मोरया गोसावी मंदिर, केशवनगर, काळेवाडी, पिंपरी सुभाषनगर, पिंपरीगाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, नवी सांगवी, जुनी सांगवी येथे आणि मुळा नदीवर वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडी येथे विसर्जन घाट आहे. मात्र, या सर्व घाटांवर सकाळ पासून पोलिस बंदोबस्त होता. मात्र, घाटांच्या परिसरात मूर्ती संकलन व्यवस्था केलेली होती.

घरीच विसर्जन...
शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केलेल्या भाविकांनी घरात किंवा घराच्या टेरेसवर ड्रम, बादलीत पाणी घेऊन विसर्जन केले. तर, पीओपीच्या मूर्ती असलेल्या भाविकांनी महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांकडे मूर्ती दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farewell to Bappa without procession in Pimpri-Chinchwad