esakal | बापरे! पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल व्यवसायाला एवढ्या कोटींचा फटका बसलाय...
sakal

बोलून बातमी शोधा

बापरे! पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल व्यवसायाला एवढ्या कोटींचा फटका बसलाय...

- 50 हजार कामगारांपैकी 95 टक्के कामगार गावी परतले 

बापरे! पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल व्यवसायाला एवढ्या कोटींचा फटका बसलाय...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायाला लॉकडाउनच्या काळात जवळपास 55 कोटी रुपयांचा फटका बसला असून, सुमारे 55 हजार कामगारांपैकी 95 टक्के कामगार त्यांच्या मूळगावी परतले आहेत. त्यामुळे या व्यवसायाला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने वीज, पाणी, मिळकतकर माफीबरोबरच विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी हॉटेल बंद न करता सर्व शासकीय अटी-शर्तींचे पालन करून चालू ठेवण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल व्यावसायिकांनी घेतला होता. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी हॉटेलमधील टेबलांचे अंतर वाढविणे, वेळोवेळी जंतुनाशक फवारणी करणे, साफसफाई करणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आदी उपाययोजना करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड हॉटेल ऍन्ड रेस्टॉरंट असोसिएशनने घेतला होता. मात्र, देशात लॉकडाउन लागू झाल्यावर हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी म्हणाले, "हॉटेल व्यवसायामधून सरकारला सर्वाधिक जीएसटीचा भरणा होत आहे. मागील वर्षी सरकारने उत्पादन शुल्कात (एक्‍साईज)मध्ये 15 टक्के वाढ केली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली असून हॉटेल व्यवसाय संकटात आहे. लॉकडाउनच्या काळात हॉटेल व्यवसायाचे सुमारे 50 ते 55 कोटी रुपये इतके नुकसान झाले आहे. सुमारे 55 हजार कामगारांपैकी 50 हजार कामगार त्यांच्या गावी परतले आहेत. त्यामुळे या काळातील उत्पादन शुल्क, वीज, पाणी आणि मिळकतकर माफ करावेत, अशी आमची मागणी आहे. याशिवाय, आम्हाला विशेष आर्थिक पॅकेजही दिले जावे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

संघटनेचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे यांनी या बाबत पालकमंत्री अजित पवार यांना नुकतेच निवेदन दिले. बॅंकाचे थकीत हफ्ते, कामगारांचा तुटवडा, भरमसाठ भाडे, इतर देणी यामुळे हॉटेल व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे लघुउद्योगांच्या धर्तीवर राज्य सरकारने हॉटेल व्यवसायाला आर्थिक पॅकेज देऊन त्याचे पुनर्वसन करावे, असे त्या निवेदनात म्हटले आहे. 


पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल व्यवसाय 

  • स्टार हॉटेल्स - 8 
  • बार/ परमीट रुम - 200 
  • 'अ', 'ब' आणि 'क' श्रेणी मिळून एकूण संख्या - सुमारे 1200 
  • हॉटेल असोसिएशनची सदस्यसंख्या - 450