गृहमंत्र्यांच्या सूचना ठरल्या नावापुरत्याच; ते पोलिस अद्यापही ऑन ड्युटीच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पन्नासपेक्षा अधिक वयाच्या पोलिसांना ठाण्यातच ड्युटी, तर 55 वर्षांवरील पोलिसांना घरीच थांबून पगार देण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली.

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पन्नासपेक्षा अधिक वयाच्या पोलिसांना ठाण्यातच ड्युटी, तर 55 वर्षांवरील पोलिसांना घरीच थांबून पगार देण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात अपुऱ्या मनुष्यबळामुळे याची अंमलबजावणी करणे कठीण होत असून, पन्नास वर्षांपुढील पोलिसही सध्या ऑन ड्युटीच असल्याचे दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यामध्ये मृत्यू होणाऱ्यांमध्ये पन्नासपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या कर्मचाऱ्यांचे वय 55 पेक्षा अधिक आहे, त्यांना घरी बसून पगार देण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यांचे वय 50 पेक्षा अधिक आहे. त्यांना पोलिस ठाण्यातच ड्युटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, गृहमंत्र्यांच्या या सूचना केवळ नावापुरत्याच राहिल्याचे दिसून येत आहे. अगोदरच अपुऱ्या मनुष्यबळात काम करताना अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. अशातच पुन्हा या कर्मचाऱ्यांना घरी बसविल्यास कामावर आणखीनच ताण येणार आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांना सरसकट रजा न देता केवळ रजेसाठी अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच रजा दिली जात आहे. त्यामुळे बरेचसे कर्मचारी अद्यापही ऑन ड्युटी असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सध्या ही परिस्थिती पहायला मिळत आहे. 

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये बाधितांचा आकडा आज दोनशे पार, तर एवढ्या जणांचे मृत्यू

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सुमारे तीस लाख लोकसंख्येचा भार अवघ्या तीन हजार पोलिसांवर आहे. यामध्ये अडीच हजार कर्मचारी, तर साडेचारशे अधिकारी आहेत. एकूण अधिकारी यामध्येच 50 ते 55 वयोगटातील 304, तर 50 पेक्षा अधिक वयाच्या 124 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार अधिक वयाच्या पोलिसांना घरी बसविल्यास कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. तरीही आयुक्तालयातील 'त्या' वयोगटातील एखाद्या कर्मचाऱ्याने रजेसाठी अर्ज केल्यास त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रजा दिली जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशातच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांनाही मोठ्याप्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या चोवीसवर गेली आहे. मागील चार दिवसात पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन वरिष्ठ निरीक्षकांसह सात पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे मागील काही दिवसांपासून अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने पिंपरी-चिंचवड पोलिस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याने बाधित झालेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करावे लागत आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात हातावर मोजण्याइतपत कर्मचारी उपलब्ध असतात. एकूण कोरोनाबाधित सतरा अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी तेरा जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या अकरा पोलिस अधिकारी, कर्मचारी विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील स्थिती 

एकूण पोलिस अधिकारी, कर्मचारी - 3000 

50 ते 55 वयोगट 

  • एकूण पोलिस अधिकारी, कर्मचारी - 304 
  • हजर अधिकारी -39 
  • हजर कर्मचारी -245 
  • रजेवर अधिकारी -3 
  • रजेवर कर्मचारी -17 

55 पेक्षा अधिक वयोगट 

  • एकूण अधिकारी, कर्मचारी -124 
  • हजर अधिकारी- 24 अधिकारी 
  • हजर कर्मचारी -87 
  • रजेवर अधिकारी-2 
  • रजेवर कर्मचारी-11

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty years old police in Pimpri-Chinchwad are currently on duty