लॉकडाउनच्या पहिल्या दिवशीच भोसरीमध्ये...

लॉकडाउनच्या पहिल्या दिवशीच भोसरीमध्ये...

भोसरी  : कोरानाच्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य सरकारद्वारे घोषित केलेल्या लॅाकडाउनला मंगळवारी (ता. १४) भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी आदी भागांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या भागातील गजबजलेले रस्ते आणि बाजारपेठेत तुरळक वाहनांची वर्दळ वगळता शुकशुकाट होता. मुख्य चौकांमध्ये पोलिसांद्वारे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहनांची चौकशीही करण्यात येत होती.

लॅाकडाउनच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी आठ वाजेपर्यंत दूध विक्रीची केंद्रे सुरू होती. सकाळी आठ वाजता भोसरी पोलिसांद्वारे भोसरी परसिरात फिरून नागरिकांना लॅाकडाउनच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भोसरीतील पीएमटी चौक, लांडेवाडी चौक आदी भागातील सकाळच्या वेळेस कंपन्यांमध्ये जाणाऱ्या कामगारांची थोड्या प्रमाणात गर्दी झालेली दिसली. मात्र, सकाळी दहानंतर काही तुरळक वाहनांच्या वर्दळीचा अपवाद सोडता सर्वच ठिकाणी शुकशुकाट दिसला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरीतील बीआरटीएस चौक, टेल्को रस्त्यावरील यशवंतनगर चौक, इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौक, दिघीतील पणे-आळंदी रस्त्यावरील बोपखेल फाटा आणि देहूफाटा आदी चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त दिसला. चौकांमध्ये बॅरिकेड लावून वाहनांना अडथळा निर्माण करण्यात आला होता. या ठिकाणी वाहनांची तपासणी करून त्यांना पुढे सोडण्यात येत होते. त्याचप्रमाणे पोलिस वाहनांद्वारे फिरून परसिस्थितीचा आढावाही घेत होते.

लॅाकडाउनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे नेहमीच गजबज असलेल्या भोसरीतील पीएमटी चौक, आळंदी रस्ता, दिघी रस्ता, पीसीएमटी चौक, लांडेवाडी चौक, पुणे-नाशिक महामार्गाचा शितलबाग ते धावडेवस्तीपर्यंतचा रस्ता, दिघीतील छत्रपती संभाजी राजे चौक, पुणे-आळंदी रस्ता, मॅगझीन चौक, इंद्रायणीनगरातील मिनी मार्केट चौक, श्री तिरुपती बालाजी चौक, साई चौक, इंद्रायणी चौक आदी भागात शुकशुकाट होता. नागरिकांनी घरीच बसणे पसंत केल्याने नागरी वस्तीमधील अंतर्गत रस्तेही ओस पडलेले दिसत होते. भोसरी एमआयडीसीत लघुउद्योग सुरू होते. मात्र, रस्त्यावर वाहनांची व नागरिकांची वर्दळ नसल्याने भोसरी एमआयडीसी सुरू आहे का बंद, असा प्रश्न येथून फेरफटका मारताना जाणवला.

पुणे-नाशिक महामार्गावर कंपन्यांच्या बसबरोबरच काही तुरळक चार चाकी वाहनांची वर्दळ दिसली. त्याचप्रमाणे कामगारही दुचाकीने सकाळी कामावर जाताना दिसत होते. पीएमपीच्या बसही दोन-तीन तासांनी रस्त्यावर दिसत होत्या.
               
जनजागृतीमुळे लॅाकडाउन यशस्वी

लॅाकडाउन घोषित केल्यानंतर महापालिका, पोलिस, सामाजिक कार्यकर्ते आदींद्वारे गेल्या तीन दिवसांपासून जनजागृती करण्यात येत होती. सोशल मीडियावरही या लॅाकडाउनची चर्चा रंगली होती. काही नागरिकांद्वारे लॅाकडाउन चुकीचा असल्याबद्दल आक्षेपही घेण्यात येत होते. त्यामुळे लॅाकडाउन यशस्वी होणार की नाही, अशी शंकाही काही नागरिकांद्वारे घेण्यात येत होती. मात्र, पोलिसांद्वारे सोमवारी (ता. १३) सायंकाळी परिसरातून पथसंचलन करत लॅाकडाउनचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे या लॅाकडाउनविषयी गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या जनजागृतीमुळे पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com