प्रशासन-लोकप्रतिनिधींच्या सहभागातून दिघी, मोशीत पहिले आदर्शवत कोविड सेंटर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

  • प्रशासन, लोकप्रतिनिधींचा सहभागातून निर्मिती
  • स्थानिक नागरिकांचे लाभले सहकार्य 

भोसरी : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून प्रभागनिहाय कोविड केअर सेंटर उभारण्याचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आज पिंपरी-चिंचवडमध्ये यशस्वी झाला. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या दिघी आणि मोशी येथील दोन कोविड केअर सेंटरचे स्वातंत्र्यदिनी (ता. 15) लोकार्पण करण्यात आले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिघीतील कार्यक्रमात नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, नगरसेविका निर्मला गायकवाड, हिराबाई घुले, अतिरिक्त आयुक्त व उपजिल्हाधिकारी अजित पवार, संजय गायकवाड आदी उपस्थित होते. तर मोशीतील कोविड केअर सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमात नगरसेवक वसंत बोराटे, माजी महापौर राहुल जाधव, नगरसेविका सारिका सस्ते, अश्विनी जाधव, शिवसेना संघटक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडमधील 'या' भाजप आमदाराने केला प्लाझ्मा दान; आता कुटुंबीयही करणार

आमदार लांडगे म्हणाले, की पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून प्रभागनिहाय कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. प्रत्येक प्रभागात किमान शंभर बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभागातील कोरोनाबाधित रुग्णांना ज्यांना मोठ्या प्रमाणात लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना घरापासून जवळच उपचार उपलब्ध होतील. तसेच, प्रभागातील स्थानिक डॉक्‍टर आणि कर्मचारी त्याठिकाणी पूर्ण महिन्याचे नियोजन करून सेवा बजावतील. गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत एकाही विधानसभा सदस्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या सहभागातून कोविड केअर सेंटर उभारण्याचा आदर्शवत प्रयत्न केला नाही. आमदार महेश लांडगे यांची संकल्पना महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी आहे, अशी भावना सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड यांनी व्यक्त केली. 

दिघी आणि मोशीतील नागरिक-डॉक्‍टरांचे आभार 

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाने सेंटर उभारण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. दिघीतील राघव मंगल कार्यालय, मोशीतील रामकृष्ण लॉन्स येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. कोरोना रुग्ण आढळलेल्या कुटुंबीयांना नागरिक परकेपणाची वागणूक देतात. मोशी आणि दिघीतील ग्रामस्थ, नागरिकांनी पिंपरी-चिंचवडकरांसमोर आदर्श उभा केला. कोविड केअर सेंटरसाठी जागा उपलब्ध झाली. या परिसरातील डॉक्‍टर आणि संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक पुढाकार घेत कोविड केअर सेंटरमध्ये सेवा करण्याची जबाबदारी घेतली. त्याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करतो, असे आमदार लांडगे यांनी सांगितले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first ideally covid center at dighi, moshi