पिंपरी : शिधापत्रिका नसलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता एवढे धान्य मिळणार...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

- कोणतीही शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना 5 किलो मोफत तांदूळ 

- मे आणि जून महिन्याचे धान्य एकाचवेळी देण्याचे प्रयत्न 

पिंपरी : कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कुटुंबाला पाच किलो मोफत तांदूळ देण्याचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय अन्नधान्य पुरवठा विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने चालू मे आणि जून महिन्याचा तांदूळ एकाचवेळी पुढील जून महिन्यात देण्याचे प्रयत्न शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून करण्यात येत आहे. या दोन्ही शहरांमधील एकूण सुमारे 1 लाख 39 हजार लोकांना हा मोफत तांदूळ देण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत ही योजना राबविली जाणार आहे. पुणे शहरात केवळ प्रतिबंधित क्षेत्रांतील लोकांसाठी मोफत तांदूळ दिला जाणार आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरात प्रतिबंधित आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अशा दोन्ही भागांतील लोकांना तांदळाचे वाटप केले जाणार आहे. मात्र, संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी एकाच भागांतील सर्वच रास्त भाव धान्य दुकानांऐवजी केवळ निवडक दुकानांमधून हा तांदूळ दिला जाणार आहे. 
शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी त्याला दुजोरा दिला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोरे म्हणाल्या, "ज्या व्यक्ती अथवा कुटुंबाकडे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नाही. त्या व्यक्तीला विशिष्ट प्रकारचा अर्ज भरून दुकानांमध्ये जमा करावा लागणार आहे. त्यामध्ये अर्जदाराचे नाव, पत्ता, जवळची खूण, शासकीय ओळखपत्राचा प्रकार, ओळखपत्र क्रमांक, मोबाईल क्रमांक ओळखीसाठी शिफारस करणाऱ्या दोन नागरिकांची नावे, त्यांचे मोबाईल क्रमांक अथवा स्थानिक नगरसेवक यांचे नाव व शिफारस अशी सर्व माहिती भरून द्यावी लागणार आहे. शासकीय ओळखपत्रामध्ये आधारकार्ड, वाहन परवाना आदी बाबींचा समावेश राहील. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामधील सुमारे 1 लाख 39 हजार लोकांना हा 5 किलो मोफत तांदूळ देण्याचे आमचे प्रयत्न राहतील.'' 

...तर फौजदारी कारवाईस पात्र ठरणार! 

माझ्याकडे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसून मी शासनाच्या कोणत्याही योजनेतील धान्याचा लाभार्थी नाही. ही माहिती खोटी आढळल्यास शासनाची फसवणूक केल्याबद्दल मी फौजदारी कारवाईस पात्र ठरेल, हे मला मान्य राहील, असे संबंधित गरजू व्यक्ती अथवा कुटूंबाला अर्जामध्येच घोषित करावे लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

- पुणे शहरातील 503 दुकानांपैकी प्रतिबंधित क्षेत्रांतील केवळ 121 दुकांनावर तांदूळ वाटप होणार 

- पिंपरी-चिंचवडमधील प्रतिबंधित आणि विना प्रतिबंधित क्षेत्रातील दुकानांचा अंतर्भाव 

- रास्त भाव धान्य दुकानांची यादी शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून लवकरच जाहीर होणार 

- गरजू व्यक्तींना स्थानिक नगरसेवक, रास्त भाव दुकानांमधून अर्ज मिळविता येतील. 

- अर्ज भरून दिल्यावर संबंधित अर्जदार व्यक्तीला पोहोच मिळणार 

- पोहोच दाखवून गरजू अर्जदार व्यक्तीला जून महिन्यात मे आणि जून अशा दोन्ही महिन्यांचा प्रत्येकी 5 किलो तांदूळ मोफत मिळणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five kg free rice to families without ration card