आगीनं आमची रोजी रोटीच केली खाक; पिंपरीतील दीडशे महिलांचा आक्रोश

सुवर्णा नवले
Thursday, 1 October 2020

  • शिलाईचं साहित्य जळालं
  • 150 महिलांचा हिरावला रोजगार

पिंपरी : "लॉकडाउनपासून हाताला काम नव्हतं. पतीलाही कुठे काम मिळालं नाही. मुलांच्या वह्या-पुस्तकालाही सध्या पैसे नाहीत. सण-उत्सवच नसल्याने घरच्या शिलाईच्या कामात राम राहिला नाही. घरात बसून खाणारी तोंडं जास्त अन्‌ कमाई दमडीची नाही, अशी आमची बिकट परिस्थिती. शिलाई मशीन तेवढा आमचा आधार उरला होता. अचानक आयुष्यात आशेचा किरण दिसला. कोरोना काळात पीपीई कीट, गाऊन, कव्हर, कॅप शिवण्याचं काम मिळालं. दिवसाकाठी चारशे ते पाचशे रुपये मिळू लागले. मात्र, पिंपरीत लागलेल्या दुकानाच्या आगीत आमचं शिलाई साहित्यच जळून खाक झालं. आमची रोजी रोटीच या आगीनं गिळली," असा आक्रोश मशीनचालक यास्मिन शेख व लक्ष्मी शेंडगे यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरीत रेल्वे उड्डाणपुलावजवळ मंगळवारी (ता. 29) पाच दुकानांना आग लागली. ही घटना पहाटे अडीचच्या सुमारास घडली. सगळे जण झोपेत असताना दुकाने जळून खाक झाली. यातील एक दुकान कपडे शिलाई साहित्याचं होतं. तब्बल 150 महिलांचा उदरनिर्वाह यावर सुरू होता. दुकानामधील शिलाई साहित्यचं जळून खाक झालं. शिलाई मशीनसह, दोरे, कटिंग मशीन, कॅनव्हास, इलास्टिक, झिप, वेलक्रो हे सर्व दीड लाखाचे साहित्य होते. दिवसभरात जेवढी ऑर्डर मिळेल तेवढी पूर्ण करायची व दूसरी ऑर्डर घ्यायची, असा दिनक्रम या महिलांचा होता. ऑर्डरप्रमाणे तेवढेच साहित्य दुकानमालक महिलांना देत असे. पहिली ऑर्डर पूर्ण झाली की दुसऱ्या ऑर्डरला पुन्हा मोजून साहित्य दिले जात असे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खराळवाडी, गांधीनगर, रहाटणी, चिंचवड, नेहरूनगर, वल्लभनगर, कुदळवाडी, मोरवाडी, अजमेरा कॉलनी, आकुर्डी, पिंपळे सौदागर या भागांतून शिलाईची कामे घेण्यासाठी महिला पिंपरीत येत असत. एक महिला दिवसाला पीपीई कीटच्या 20 ते 25 ऑर्डर वेळेत पूर्ण करून देत असे. चैन लावणे, पीपीई कीट व मास्कची बारीक- मोठी शिलाई करणे, कापड कटिंग करणे, बॉडी कव्हर व कॅप शिवणे असे वेगवेगळे काम आपापल्या कौशल्याप्रमाणे महिलांनी हाती घेतले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनपासून माझ्याही हाताला काम नव्हतं. मी कपड्याच्या मालाचा पुरवठा करायचे. त्यानंतर दुकानाचा वापर कोरोना काळात शिलाई मशीनच्या साहित्यासाठी केला. नंतर ऑर्डर मिळत गेल्या. ते काम हाती घेतलं. त्यानंतर मी जवळपास 150 महिलांना शिलाईचं काम मिळवून दिलं. पीपीई कीटसह सर्व साहित्याची खूप कमतरता शहरात भासत होती. त्यामुळे ऑर्डर वेळेत पूर्ण करून द्यायचे. महिलांनाही गरज होती. संसार चालवायचा होता. खरंतर महिलांच्या मदतीमुळे मी काम करू शकलो. मात्र, अस्मानी संकटच ओढवलं. सर्व महिलांचा रोजगार क्षणातच हिसकावला गेला. मी हतबल झालो आहे. कामाच्या गडबडीत दुकानाचा विमाही काढला नाही.

- दिलेर खान, दुकान मालक, पिंपरी

महिलांना मिळणारे ऑर्डरीप्रमाणे पैसे (रुपये)

  • पीपीई कीट : 20 
  • गाऊन : 11
  • डेडबॉडी कव्हर : 28
  • शू कव्हर : 4
  • कॅप : 8

हे शिलाई साहित्य जळालं

पंखा, काऊंटर, कपड्याचे रोल - 8, रिब्ज - 100 किलो, प्लॅस्टिक रोल- 38 किलो, कटिंग मशीन -1, दोरे व इतर साहित्य जवळपास 5 ते 6 लाख रुपयांचे होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five shops fire near pimpri railway flyover