Video : एकाच पुलाचं दोन वेळा उद्घाटन; भाजप-राष्ट्रवादीत रंगलाय श्रेयवाद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

स्थानिक नागरिक व पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार महापौर उषा ढोरे यांनी नऊ मार्च रोजी त्या मार्गिकेचे उद्‌घाटन केले. मात्र, दुसऱ्या दिवशी प्राधिकरणाने पुलाच्या दोन्ही बाजूला मुरूम टाकून वाहतूक रोखली होती.

पिंपरी : औंध-रावेत बीआरटी मार्गावर पिंपळे सौदागर येथील साई चौकात (जगताप डेअरी चौक) पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने उड्डाणपूल उभारला आहे. त्याच्या रावेतकडून औंधकडे जाणाऱ्या मार्गिकेचे उद्‌घाटन गेल्या वर्षी झाले असून ती रहादारीस खुली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे औंधकडून रावेतकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम तीन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, उद्‌घाटन बाकी होते. स्थानिक नागरिक व पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार महापौर उषा ढोरे यांनी नऊ मार्च रोजी त्या मार्गिकेचे उद्‌घाटन केले. मात्र, दुसऱ्या दिवशी प्राधिकरणाने पुलाच्या दोन्ही बाजूला मुरूम टाकून वाहतूक रोखली होती. पुलाचे काम बाकी असल्याचे काम त्या वेळी करण्यात आले होते. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास पालकमंत्री अजित पवार यांनी उद्‌घाटन केले. या कार्यक्रमावर शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला. महापौर ढोरे यांनी पाठ फिरवली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पालकमंत्र्यांनी केला सोशल डिस्टंसिंगचा भंग : भाजप 

गेल्या तीन महिन्यात पुलाचे कोणतेही काम झाले नाही. केवळ पालकमंत्री अजित पवार यांची वेळ मिळत नव्हती, त्यांच्या हस्तेच उद्‌घाटन करायचे, अशी भूमिका घेतल्यामुळे म्हणून नागरिकांना वेठीस धरले. पालकमंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंगचाही भंग केला आहे, असा आरोप महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला. भाजपच्या काळात पुलाचे काम झालेले होते. त्याचे श्रेय घ्यायचे असते, तर आमच्या नेत्यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण केले असते. परंतु, त्याची वाट न पाहता केवळ लोकांच्या आग्रहास्तव आम्ही महापौरांच्या हस्ते नऊ मार्च रोजी केले होते, असे ही ढाके यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोना वॉर रूमची पवारांकडून पाहणी 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने मुख्य प्रशासकीय इमारतीत उभारलेल्या वॉर रूमला भेट देऊन अजित पवार यांनी माहिती घेतली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वॉर रूम व शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती पवार यांना दिली. पालकमंत्र्यांच्या वॉर रूम भेटीचा कार्यक्रम त्यांच्या दौऱ्यात नव्हता. मात्र, ते वॉर रूमला भेट देणार असल्याचा निरोप आम्हाला ऐनवेळी देण्यात आला. मी व महापौर उषा ढोरे महापालिकेत पोहचेपर्यंत पालकमंत्री तेथून निघाले होते, असेही ढाके यांनी सांगितले. 

एकाच पुलाचे दोन वेळा लोकार्पण 

औंध-रावेत रस्त्यावरील साई चौक उड्डाणपुलाचे तीन महिन्यात दोन वेळा लोकार्पण झाले. त्यामुळे हा पुल चर्चेत राहिला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी नऊ मार्च रोजी महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण केले होते. आज पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जबाबदारी वाढल्याने पिंपरीत जास्त येऊ शकत नाही : पवार 

राज्याची जबाबदारी असते. मुंबईत थांबावं लागतं. त्यामुळे शहरात फारसं येऊ शकत नाही. आजही आषाढी वारीनिमित्त बैठक आहे. या अडीच महिन्यात अनेक धर्म, पंथांचे सण येऊन गेले. त्यात अडचणी आल्यात. असे सण आपल्याला घरात बसूनच साजरे करावे लागले. प्रशासनाला आपण सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. कोरोनासाठी सर्वांची मदत घेण्याचे काम सुरू आहे. त्याला आपला सर्वांचा पाठिंबा गरजेचा आहे. आज पंतप्रधान देशाला उद्देशून बोलतील. ते काय निर्णय घेतील, संदेश देतील, त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेईल, अशी आपणांस ग्वाही देतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flyover opening ceremony by deputy chief minister ajit pawar at aundh ravet road sai chowk pimpri